। कल्याण । प्रतिनिधी ।
अनेक शहरांमधील धोकादायक इमारतींच्या याद्या निघत असून आता कल्याण पश्चिमेतील रामबाग विभागात एक अतिधोकादायक इमारत आज (बुधवार) सकाळी कोसळली. या इमारतीत राहत असलेले एक ज्येष्ठ नागरिक कुटुंब इमारतीचा ढिगारा अंगावर पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले. तेथे गंभीर दुखापत झालेले एक रहिवासी प्राथमिक उपचार सुरू असताना मरण पावल्याचे घोषित करण्यात आले.
रामबाग विभागात 25 वर्षाहून अधिक वर्षाची कोशे नावाची ही दोन माळ्यांची इमारत असून ती धोकादायक झाल्याने यातील रहिवासी स्थलांतरित झाले होते. या इमारतीच्या तळ मजल्यावर व पहिल्या मजल्यावर कोणीही राहत नव्हते. इमारतीच्या दुसर्या माळ्यावर सूर्यभान काकड (52), उषा काकड (49) हे कुटुंब राहत होते. ही इमारत धोकादायक झाल्याने पालिकेच्या ब प्रभागातून वेळोवेळी या इमारतीच्या मालकाला नोटिसा दिल्या असल्याचे एका पालिका अधिकार्याने सांगितले. इमारतीचा ढिगारा बाजुच्या घरांवर पडल्याने रज्जाक शेख यांच्या घराचे नुकसान झाले.
घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली. जवान, रहिवाशांनी ढिगार्याखाली अडकलेल्या काकड कुटुंबीयांना बाहेर काढले. त्यांना इमारतीचा काही भाग अंगावर पडल्याने जखमा झाल्या होत्या. या भागातील रहिवासी जयदीप सानप यांनी तातडीने हालचाली करुन रुग्णवाहिका बोलावून दोन्ही जखमींना पालिका रुग्णालयात नेले तेथे त्यांना मृत घोषित केले. उषा काकड यांच्यावर उपचार करण्यासाठी पालिका रुग्णालयात डॉक्टर नसल्याने, त्यांना खासगी रुग्णालयात न्यावे लागले, असे सानप यांनी सांगितले. पालिका रुग्णालयातील डॉक्टर 11 वाजता येतात, असे उत्तर सानप यांना देण्यात आले. निवासी डॉक्टरची सोय पालिका प्रशासनाला रुग्णालयात करता येत नाही का? सामान्य कुटुंबातील रहिवाशांनी अशा परिस्थितीत काय करायचे?, असे प्रश्न यानिमित्ताने केले जात आहेत. पालिका ब प्रभागाचे साहाय्यक आयुक्त किशोर ठाकुर, पालिका तोडकाम पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. ढिगारा उपसण्याचे काम पालिका कामगार, जवानांनी सुरू केले आहे.