दुर्घटना घडल्यानंतरच विषय चर्चेला
| उरण | वार्ताहर |
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून धोकादायक इमारतींच्या मालकांना धोकादायक भाग उतरवून घेण्याच्या सूचना दिल्या खर्या; परंतु शहरात इमारतींमध्ये अजूनही रहिवासी राहात आहेत. दुसरीकडे मालक किंवा भाडेकरूंनी धोकादायक भाग स्वतः न उतरविल्यास पोलीस बंदोबस्तात उतरवून तो खर्च संबंधितांकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, निवडणुकीमुळे फक्त नोटिशीचा सोपस्कार पार पाडण्यातच पालिका धन्य झाली आहे. शहरात धोकादायक इमारती आहेत. धोकादायक इमारती ढासळण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात हे प्रमाण अधिक असते. परंतु, एकदा नोटीस बजावल्यानंतर त्याकडे फारसे पालिका किंवा त्या जागेत राहणारे भाडेकरू, मालक लक्ष देत नाही. एखादी दुर्घटना घडल्यास पालिकेचे अधिकारी नोटीस बजावल्याचे कारण देऊन हात वर केले जातात. आर्थिक नुकसान किंवा जागेवरचा दावा जाईल म्हणून तेथे राहणारे रुम सोडत नाही.
तीस वर्षे पूर्ण झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करून ती जागा राहण्यायोग्य आहे की नाही, याबाबत प्रमाणपत्र घ्यावे त्यानंतरच निर्णय घ्यावा. राहण्यायोग्य इमारत नसल्यास त्या जागेत वास्तव्य करू नये किंवा नवीन इमारत बांधावी, अशा स्पष्ट सूचना आहेत. परंतु, याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. दुर्घटना घडल्यानंतरच विषय चर्चेला येतो.






