Krushival Impact: धोकादायक वीजखांब तात्काळ बदलले

महावितरणकडून तातडीने कार्यवाही; ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त

| पाली / बेणसे | प्रतिनिधी |

बेणसे येथील सिद्धार्थ नगर परिसरातील गंजलेले, तळाशी पोखरलेले व धोकादायक अवस्थेतील वीजखांब अखेर महावितरण विभागाकडून तातडीने बदलण्यात आले आहेत. दैनिक कृषीवलने या गंभीर समस्येला वाचा फोडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, संभाव्य दुर्घटना टळल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

सिद्धार्थ नगर परिसरातील प्रवेशद्वाराजवळील तसेच समीर अडसुळे यांच्या घराजवळील विद्युत खांब पूर्णपणे गंजून जर्जर झाले होते. काही खांब एका बाजूला झुकलेल्या अवस्थेत असल्याने कोणत्याही क्षणी ते कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात होती. याशिवाय बेणसे मोहल्ला परिसरातील आशिफ मोमीन यांच्या घराजवळील धोकादायक पोलबाबतही नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. येथील जुने पोल बदलण्यात आले.

विशेष म्हणजे या भागात लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. पावसाळ्याच्या तोंडावर गंजलेल्या पोलमुळे जीवितास गंभीर धोका निर्माण झाला होता. जोरदार वारा किंवा पावसामुळे पोल कोसळून विजेच्या तारा तुटल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात होती. दरम्यान, या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध होताच महावितरण विभागाने तातडीने दखल घेत संबंधित धोकादायक वीजखांब हटवून नवीन मजबूत पोल उभारण्याचे काम हाती घेतले. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली असून, नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ग्रामस्थांनी महावितरण विभागाचे आभार मानत, परिसरातील इतर धोकादायक विद्युत यंत्रणांचीही तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version