डफावरची थाप थांबली

शाहीर हेगडेेेंचे मरणोत्तर देहदान
मुंबई | प्रतिनिधी |
राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध शाहीर लीलाधर हेगडे यांचे शनिवारी सकाळी अंधेरी येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा आणि सून असा परिवार आहे.हेगडे यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले. मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयाकडे त्यांचे पार्थिव सोपवण्यात आले.शाहिरांच्या निधनाने गेली साठ वर्षाहून अधिक काळ पहाडी आवाजात घुमणारी डफावरची थाप कायमची लुप्त झाली.
हेगडे यांना 2014 साली अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हापासून ते आजारी होते. स्वातंत्र्य, समता आणि मानवतेची मूल्ये त्यांनी जपली आणि आपल्या शाहिरीतून त्यांचा प्रसार आणि प्रचार केला. राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकाचे शाहीर एवढीच लीलाधर हेगडे यांची ओळख नव्हती. महाराष्ट्र दर्शन, शिव दर्शन, भारत दर्शन अशा एकाहूनएक सरस कलापथकांमुळे त्यांनी राष्ट्र सेवा दलाला देशभर एक नवी ओळख मिळवून दिली. अस्पृश्यता निवारण चळवळीतील त्यांचे योगदानही मोठे होते. सांताक्रूझ येथील झोपडपट्टी परिसरात त्यांनी साने गुरुजींच्या नावाने आरोग्य मंदिर आणि शाळाही उभारली. हेगडे यांना अभिनयाचीही उत्तम जाण होती. पु. ल. देशपांडे यांच्या ‘पुढारी पाहिजे’ लोकनाटकात रोंग्या हे पात्र त्यांनी साकारले होते.

Exit mobile version