महायुतीत समन्वय साधण्यासाठी दरेकर अलिबागमध्ये


| थळ | विशेष प्रतिनिधी |

इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांचा तडाखेबाज प्रचार सुरु आहे. मात्र, विरोधी गटातील नेते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय नाही. त्यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी, त्यांना कामाला लागा, असे सांगण्याची वेळ भाजपाचे निरीक्षक प्रवीण दरेकर यांच्यावर आली. या खास मोहिमेसाठी ते सोमवारी (दि. 29) अलिबाग-थळ येथे आले होते. निवडणुका जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार, आमदार जयंत पाटील, नाना पटोले यांनी समन्वय साधत अनंत गीते यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर गीते हे आपल्या घटक पक्षातील सर्व सहकार्‍यांसह कामाला लागले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला आहे.

गीतेंच्या प्रचारासाठी घटक पक्षातील योग्य अशी यंत्रणा कामाला लागली आहे. जाहीर सभा, प्रचार रॅली, कॉर्नर सभा, गाव बैठका, घरभेटीतून थेट मतदारांशी संपर्क साधण्यात येत आहे. त्याला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गीतेंची लोकप्रियता वाढत असल्याने विरोधी उमेदवार सुनील तटकरे यांच्या महायुतीचे टेन्शन वाढले आहे. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) शिंदे गट, मनसे, भाजपा या घटक पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये अद्यापही म्हणावा तसा सुसंवाद दिसून येत नाही. भाजापासाठी तटकरे निवडून येणे फार आवश्यक आहे. यासाठी आज स्वतः भाजपाचे निरीक्षक हे अलिबाग-थळ येथे आले होते. त्यांनी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिंदे गट, मनसे या प्रमुख नेत्यांसह पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते यांच्या मनोमिलनासाठी बैठक घेतली. महायुतीमध्ये मनोमिलन घडवण्यासाठी बड्या नेत्याला यावे लागते. यावरुनच महायुतीमध्ये धुसफूस असल्याचे बोलले जाते. सर्वांनी समन्वय साधावा, आपापसातील मतभेद विसरुन कामाला लागा, अशा सूचना जाहीरपणे दरेकर यांनी केल्या. त्याला आता महायुतीमधील घटक पक्ष किती प्रमाणात प्रतिसाद देतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Exit mobile version