खोपोली येथील वीरेश्वर मंदिरात धाडसी चोरी

11 किलोहून अधिक वजनाची चांदीची पिंड लंपास; सीसीटीव्हीत चोरटे कैद, शहरात खळबळ

| खोपोली | प्रतिनिधी |

खोपोली शहरातील ऐतिहासिक आणि पेशवेकालीन वीरेश्वर मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरी करत शिवलिंगावरील तब्बल 11 किलोहून अधिक वजनाची चांदीची पिंड लंपास केली. मंदिराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केलेल्या चोरट्यांनी चोरीनंतर मंदिराच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून पलायन केले. हा संपूर्ण प्रकार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेमुळे खोपोली शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.19) पहाटे साडेतीनच्या सुमारास मंदिरातील नित्यपूजा आणि साफसफाईसाठी पुजारी व नियमित भाविक मंदिरात आले असता मागील प्रवेशद्वारासह गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळले. संशय आल्याने गाभाऱ्याची पाहणी करण्यात आली असता शिवलिंगावरील चांदीच्या पिंडीचा कळस आणि पिंडीखालील चांदीचे आच्छादन चोरीस गेल्याचे उघडकीस आले. त्यानंतर मंदिराचे विश्वस्त आणि खोपोली पोलिसांना तातडीने याची माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मंदिर परिसराची पाहणी करून पुरावे गोळा केले तसेच सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात दोन अज्ञात चोरटे चांदीची पिंड घेऊन मंदिराच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारत पसार होताना स्पष्टपणे दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. या दृश्यांच्या आधारे संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

वीरेश्वर मंदिर हे खोपोली व खालापूर तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असून, त्याला ऐतिहासिक महत्त्वही आहे. शहराच्या मध्यवर्ती आणि दाट लोकवस्तीच्या परिसरात असलेल्या या मंदिरात चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संताप व्यक्त होत आहे. लक्ष्मीनगर, वरची खोपोली यांसारख्या वस्तीच्या भागालगत असलेल्या मंदिरात चोरट्यांनी इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने चोरी केल्याने शहरातील सुरक्षेच्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चोरीस गेलेल्या चांदीच्या पिंडीची किंमत मोठी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून, आरोपींना तातडीने अटक करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. पोलिसांनी परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून, विविध पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत.

Exit mobile version