वीज बिल थकीत असल्याने वीज पुरवठा खंडित; आर्थिक व्यवहार ठप्प
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कळंब येथे आदिवासी आणि ग्रामीण भागासाठी बँक उभी राहिली. 50हून अधिक गावे आणि वाड्या यांचा संपर्क असलेल्या कळंब येथील देना बँकेचे वीज जोडणी कापण्यात आली आहे. वीज देयक थकीत असल्याने महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. दरम्यान, वीज पुरवठा खंडित झाल्याने येथील बँक व्यवहार सोमवारी (दि.23) मार्च पासून बंद पडले असून बँके बाहेर ग्राहकांची गर्दी झाली आहे.
कळंब या कर्जत- मुरबाड राष्ट्रीय महामार्ग येथील गावाचे आसपास असलेल्या 50हून अधिक गावे आणि आदिवासी वाड्या यांच्यासाठी बँक उभी राहिली. तेथील देना बँकेत 20 हजार हून अधिक खातेदार असून, या बँकेचा कारभार सतत चर्चेत येत असतो. काही वर्षांपूर्वी या बँकेच्या इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती आणि तेथील लोखंडी तिजोरी वगळता अन्य सर्व त्या आगीत जळून खाक झाले होते. त्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेल्या या बँकेत गेली दोन दिवस काळाकुट्ट अंधार आहे. बँकेचे वीज जोडणी त्यांचे वीज देयक थकल्याने कापण्यात आले आहे. त्याचा परिणाम बँकेच्या आतमध्ये पूर्ण अंधार असून बँकेचे इन्व्हर्टर बॅक अप देखील कालच संपला आहे. त्यामुळे आज तर बँकेत बसण्याची देखील व्यवस्था नाही एवढा अंधार बँकेमध्ये निर्माण झाला आहे. 27 हजाराचे बील थकल्याने महावितरण कंपनीच्या कळंब सहाय्यक अभियंता कार्यालयाने येथील वीज जोडणी कापली आहे.
सध्या महावितरणची थकीत वीज वसुली मोहीम सुरू असून, त्याद्वारे सलग दोन महिन्याचे वीज देयक थकले असल्यास वीज जोडणी तोडून टाकले जात आहे. तर काही हजारात वीज देयक थकीत असल्यास वीज जोडणी कापण्याची आणि वीज मीटर काढून नेण्याची कार्यवाही महावितरण करीत आहे. महावितरण कंपनीच्या या धडक कारवाईमुळे कळंब येथील देना बँकेत अंधार पसरला आहे.
ग्रामीण आणि आदिवासी भागातील सर्व खातेदार या बँकेत आहेत आणि मार्च अखेर असल्याने देणी फेडण्यासाठी आर्थिक व्यवहार केले जात असतात. असे व्यवहार करण्यासाठी ग्राहक सध्या बँकांमध्ये गर्दी करून असतात. कळंब येथील देना बँकेत आज सकाळपासून दूर दूर वरून ग्राहक येत असून, वीज बंद असल्याने बँकेचे व्यवहार बंद आहेत आणि त्यामुळे ग्राहकांना कोणतेही व्यवहार करता येत नाहीत. त्यामुळे पैशाची चणचण असलेल्या ग्राहकांना हात हलवत परत जावे लागत आहे. त्याचवेळी सध्या लग्न सराई सुरू झाली असून, पैशाची गरज सर्वांना असून बँकेत आर्थिक व्यवहार करण्यासाठी ग्रामीण भागांतून कळंब येथे पोहोचणारे ग्राहक यांना उन्हात रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
वीज पुरवठा खंडित असल्याने आर्थिक कोणतेही व्यवहार तेथे होत नाहीत. सर्व प्रकार 23 नोव्हेंबरपासून सुरू असून महावितरणकडे थकीत असलेले 27 हजाराचे देयक बँकेने भरावे.
लक्ष्मण पोसाटे,
बँकेचे ग्राहक
