महामार्गावर अंधार; दिवाबत्तीकडे दुर्लक्ष

। नवी मुंबई । वार्ताहर ।
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवी मुंबईतून जाणार्‍या शीव पनवेल महामार्गावरील दिवाबत्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सहा महिन्यांपूर्वी ती पालिका प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आली. मात्र तरीही अनेक ठिकाणी अंधार कायम असल्याने वाहनचालकांसह नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू असून आठवडाभरात या कामांना मंजुरी मिळेल, असा विश्‍वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

शीव पनवेल महामार्ग हा शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याने येथील स्वच्छता सर्वेक्षण, दिवाबत्ती इत्यादी आवश्यक सुधारणांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेला सार्वजनिक बांधकाम विभागावर अवलंबून राहावे लागत होते. या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी याचे खापर नवी मुंबई महापालिकेवर फोडत होते. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील महामार्गावरील दिवाबत्तीदेखभाल दुरुस्ती महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात यावेत, अशी मागणी होत होती. मात्र अनेक वर्षे हा प्रश्‍न प्रलंबित होता. त्यामुळे महामार्गावरील दिवाबत्तीचा प्रश्‍न आणखी गंभीर झाला होता.

जानेवारी महिन्यात हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागामार्फत नवी मुंबई महापालिकेला यापोटी 8 कोटी 29 लाख रुपये निधीही देण्यात आलेला आहे. त्यानंतर हा महामार्ग एलईडी दिव्यांनी उजाळणार, अशी घोषणा महापालिका प्रशासनाने केली होती. त्यानुसार निविदा प्रक्रियाही राबवण्यात येत आहेत. मात्र याला सहा महिने झाले तरी या महामार्गावरील दिवाबत्तीचा प्रश्‍न कायम आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.या संदर्भात पालिका प्रशासनाला विचारणा केली असता आठवडाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन दिवाबत्तीची कामे केली जातील, असे आश्‍वासन देण्यात आले आहे.

Exit mobile version