राज्यावर अंधाराचे सावट

| मुंबई | वृत्तसंस्था |
राज्यातील औष्णिक वीज केंद्रांमध्ये भीषण कोळसा संकट निर्माण झाले असून, राज्यात अर्धा ते दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध आहे. त्यामुळे औष्णिक वीज केंद्रातील चार युनिटचे उत्पादन कोळसा नसल्याने ठप्प पडले आहे. कोराडी औष्णिक वीज केंद्रातील 660 मेगावॅट क्षमतेचे युनिट क्रमांक 6 सुद्धा याच कारणामुळे कधीही बंद होऊ शकते. त्यामुळे राज्य अंधारात जाण्याची शक्यता अधिक आहे. पुरेसा कोळसा उपलब्ध नसल्याने महत्त्वाच्या चार युनिटचे उत्पादन बंद पडले आहे. कोराडी औष्णिक वीज केंद्रातील 660 मेगावॅट क्षमतेचे युनिट क्रमांक 6 सुद्धा याच कारणामुळे कधीही बंद होऊ शकतो. तीन दिवसांपेक्षा कमी कोळशाचा साठा असेल तर वीज केंद्रासाठी अतिसंवेदनशील स्थिती मानली जाते. राज्यातील सर्वच वीज केंद्र सध्या या श्रेणीत आले आहेत. महाजेनको सूत्रानुसार, वेकोलिकडून अनेक दिवसांपासून अपेक्षित 18 रॅकऐवजी केवळ 10 रॅकचा पुरवठा होत आहे. सर्व कोळसा कंपन्यांमधून दररोज 25 रॅक कोळशाचा पुरवठा अपेक्षित असतो. परंतु, सध्यातरी सरासरी 18 रॅक मिळत आहे. यामुळे केंद्रांतील स्टॉक कमी होत आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाल्याने कोळसा उत्पादन प्रभावित झाले. वाहतुकीतही समस्या येत आहे. त्यामुळे साठाही कमी होत चालला आहे. सध्या रोजच्या पुरवठ्यावर भागवले जात आहे. गुरुवारी विजेची मागणी 18,037 मेगावॅट होती. ही पूर्ण करण्यात आल्याचा दावा महावितरणने केला आहे. परंतु, भविष्यात संकट उभे राहू शकते, असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. प्रशासनाने वेळीच हालचाल केली नाही तर विजेची समस्या उभी राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वीज केंद्रातील कोळशाची स्थिती

केंद्र उपलब्ध साठा
खापरखेडा – अर्धा दिवस
पारस – सव्वा दिवस
भुसावळ – एक दिवस
कोराडी – दोन दिवस
नाशिक – दीड दिवस
चंद्रपूर – दीड दिवस
परळी – दीड दिवस

एनटीपीसी आणि खासगी क्षेत्र प्रभावित
कोळसा संकटामुळे मौदा येथील एनटीपीसी केंद्रातील एक युनिट ठप्प आहे. खासगी क्षेत्रही प्रभावित झाले आहे. अदानीच्या तिरोडा केंद्रातील उत्पादन घटले आहे. रतन इंडियाचे एक युनिट व सीजीपीएलची दोन युनिट बंद करावी लागली. दुसरीकडे गॅसआधारित उरण प्रकल्पातील एक युनिट गॅस नसल्याने बंद आहे.

बंद पडलेले युनिट
कोळसा नसल्याने चंद्रपूर येथील युनिट क्रमांक 4, नाशिक येथील युनिट क्रमांक 5 व खापरखेडा येथील युनिट क्रमांक 1 व 2 बंद पडले आहेत. कोराडीतील एक युनिट आपत्कालीन कारणांमुळे बंद आहे.

Exit mobile version