पथदिवे बंद असल्याने काळोखाचे साम्राज्य
नागरिकांमधून व्यक्त होतोय संताप
। पनवेल । वार्ताहर ।
कामोठे वसाहतीतील पथदिवे बंद असल्याने प्रमुख रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवर अंधार पसरल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वारंवार सांगूनही सिडकोकडून दिवे लावले जात नाहीत. अंधारामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. कामोठे वसाहत ही सिडको निर्मित आहे. पाणी, रस्ते, गटारे, रात्रीचे प्रकाशमय पथदिवे वसाहतीसाठी सिडकोकडून सुविधा देणे अपेक्षित आहे. मात्र मुख्य रस्त्यासह, अंतर्गत रस्ते, वसाहतीतील सिडकोकडून बसवण्यात आलेले पथदिवे दोन महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत. सेक्टर 21 मधील पथदिवे बंद असल्यामुळे वसाहतीत अंधार पसरला आहे. रात्री महिलांना घराबाहेर पडण्यासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लहान मुले अंधारात बाहेर पडता न आल्यामुळे अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. अनेकवेळा अर्ज, विनंत्या करूनही सिडकोकडून पथदिवे सुरू केले जात नाहीत. त्यामुळे नागरिकांना अंधारातून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे महिला-तरुणींना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकार्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे; अन्यथा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
कामोठे येथील वसाहतीत दिव्याखाली अंधार
