लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख जाहीर

रक्षाबंधनापूर्वीच पहिला हप्ता; मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय

। मुंबई । वृत्तसंस्था ।

संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला असून 17 ऑगस्ट रोजी भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टलाच मिळणार आहे. रक्षाबंधन 19 ऑगस्टला आहे. त्यापूर्वीच सरकारने लाडक्या बहिणींसाठी पहिला हप्ता अदा करण्याचा निर्णय घेतला आहे.

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय झाला असून 17 ऑगस्टच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 17 ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचा विचार आहे.लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत 1 कोटी 60 लाख महिलांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेले आहेत. त्यापैकी 1 कोटी 27 लाख अर्ज मंजूर झाले आहेत. सरकार लाभार्थी महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देणार आहे. त्यामुळे राज्यातून अजूनही महिला अर्ज दाखल करत आहेत. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने ही योजना जाहीर केल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. शिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करण्यावरुनही विरोधकांनी रान उठवलेलं आहे. तरीही राज्य सरकार आपल्या योजनेवर ठाम असून राज्यात महिलांना लवकरच महिन्याला पैसे मिळण्यास सुरुवात होईल.

Exit mobile version