निवडणूक आयोगापुढे ठाकरे, शिंदे गटाची सुनावणी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
शिवसेनेतील बंडखोरीनंतर केवळ राज्यातील महाविकासआघाडी सरकारच कोसळलं नाही, तर शिवसेना कोणाची हाही संघर्ष सुरू झाला. शिवसेनेचा धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कोणाचं यावर सोमवारी (दि.12) मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर सुनावणी झाली. यावेळी निवडणूक आयोगाने या प्रकरणाची सुनावणी पुढील वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलली आहे. याबाबत ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी माहिती दिली.
अनिल देसाई म्हणाले, मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर सुनावणी झाली. त्यांनी दोन्ही बाजुंचं म्हणणं ऐकलं. त्यावर आज सुनावणी होईल अशी आमची अपेक्षा होती. मात्र, मुख्य सुनावणीबाबत इतर अनेक कागदपत्रे सादर झाली होती. तसेच आणखी दोन ते तीन अर्जही आले होते. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या प्रकरणावर सुनावणी सुरू होईल, असं सांगितलं.
आज युक्तिवाद होऊ शकला नाही. आज केवळ पाच ते सात मिनिटांचं कामकाज झालं. आम्ही सर्व कागदपत्रे सादर केली आहेत. मूळ दस्तावेज दिले त्यांची छाननी करून खरं काय, खोटं काय, चूक काय, बरोबर काय यावर प्रकाशझोत टाकला जाईल, असं आम्हाला आज अपेक्षित होतं, असं मत अनिल देसाईंनी व्यक्त केलं.
तीन लाख प्रतिज्ञापत्र सादर
आम्ही निवडणूक आयोगाकडे तीन लाख प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. तसेच प्राथमिक सदस्यांच्या नोंदीची कागदपत्रेही दिली आहेत. या मूळ सुनावणीबरोबर अनेक अर्जही आहेत. त्या सर्व गोष्टींवर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उहापोह होणार आहे, असंही देसाईंनी नमूद केलं.






