पक्ष प्रवेशाला तारीख पे तारीख; भाजपकडून विरोध

। मुंबई । वृत्तसंस्था ।

ठाकरे गटात नाराज असलेल्या दिपाली सय्यद आज शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. दरम्यान, भाजपकडून त्यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध दर्शवला आहे.

बुधवारी ९ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्याच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना, येत्या शनिवारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र पक्षप्रवेश पुढे ढकलत रविवारी १३ नोव्हेंबरला ठेवण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात दीपाली सय्यद यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे शिंदे गटातील प्रवेशाला भाजपचा तीव्र विरोध आहे. शिंदे गटाने पक्ष प्रवेश दिल्यास भाजप- शिंदे गटातील संबंधांमध्ये तणाव निर्णाण होऊ शकतो. या भीतीने शिंदे गटातील प्रवेश लांबवला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

भाजपकडून पक्षप्रवेशाला कडाडून विरोध
भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या मृणाल पेंडसे यांनी हा विरोध केला आहे. महाविकास आघाडीच्या काळात दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर आक्षेपार्ह विधाने केली होती. अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या दिपाली सय्यद यांना आमचा विरोध आहे त्यामुळे त्यांनी मोदी आणि भाजपची जाहीर माफी मागावी, तरच त्यांना प्रवेश देण्यात यावा, असं मृणाल पेंडसे यांनी सांगितलं.

Exit mobile version