‘दिगंबरा’च्या जयघोषात दुमदुमली चौलनगरी
भक्तांनी याचि देही याचि डोळा अनुभवला पालखी सोहळा
। चौल । राकेश लोहार ।
कोरोनाचे संकट टळू दे, असे साकडे घालत ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषात चौल भवाळे येथील पर्वतनिवासी दत्त मंदिरातून दत्तमहाराजांच्या पादुकांवर अभिषेक घालून पालखी परिक्रमणेला गुरुवार, दि. १० फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता सुरुवात झाली. यावेळी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पालखीवर होणारी फुलांची उधळण, ठिकठिकाणी सुवासिनींकडून करण्यात येत असलेले पादुकांचे औक्षण, दर्शनासाठी भाविकांची होत असलेली गर्दी, सोबत टाळ-मृदुंगाचा गजर अन् अव्याहतपणे सुरु असलेल्या भजनाच्या गायनाने चौलनगरी दुमदुमून जाऊन वातावरण भक्तीमय झाले होते.
श्री दत्तकृपा अन्नछत्र ट्रस्ट, अलिबागचे अध्यक्ष महेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तमहाराजांच्या पादुकांच्या पायी पालखी परिक्रमेणेचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीचे पालखी परिक्रमेचे हे तिसरे वर्ष होते. त्याचे सर्व श्रेय दत्तकृपा अन्नछत्र ट्रस्ट अलिबागला जाते. या पालखी परिक्रमणेत शेकडोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. पर्वतनिवासी दत्तात्रेयांचे स्वयंभू स्थान असलेल्या संपूर्ण भोवाळे डोंगराला पालखी प्रदक्षिणा घालण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करीत हा पालखी सोहळा संपन्न झाला. यावेळी पालखीतील सर्व भक्तांना मास्कचे वाटप करण्यात आले होते. तसेच स्वच्छतेसाठी सॅनिटायझरचाही वापर करण्यात येत होता.
दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबराचा अखंड जयघोष, टाळ मृदंगाचा गजर, पादुका आणि मूर्तीवर होणारी पुष्पवृष्टी, मंदिरात केलेली विविधरंगी फुलांच्या माळांची आकर्षक सजावट आणि याची देही याची डोळा हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी ठिकठिकाणी मुख्य रस्त्यावर जमलेली भाविकांची गर्दी अशा भक्तिमय वातावरणात दत्तमहाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. ही पालखी चौल भोवाळेमार्गे मुख्य रस्त्यावरुन चौलनाका, चौल भाटगल्ली, सागमळा, चौलमळा येथून पुढे देवघर, सराई, हनुमानपाडा अशी मार्गक्रमणा करीत भवाळे येथून दत्तमंदिरात सायंकाळी पाचच्या सुमारास प्रस्थान झाली. या पालखी मिरवणुकीने संपूर्ण चौल परिसर दुमदुमून गेला होता. ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून पिण्याचे पाणी आणि सरबताचे वाटप करण्यात आले. मध्यान्ह भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. पालखी परिक्रमणेचा कार्यक्रम पार पडल्यानंतर मंदिरात महाआरती होऊन उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. महाप्रसादाच्या आस्वादाने भाविक कृतार्थ झाल्याचे पाहावयास मिळाले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री दत्तकृपा अन्नछत्र ट्रस्ट अलिबाग विश्वस्त मंडळ अध्यक्ष महेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चौल ग्रामस्थ व मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या दत्तभक्तांनी मेहनत घेतली.
पालखी परिक्रमेचे हे सलग तिसरे वर्ष असून, याहीपुढे हा सोहळा दरवर्षी अखंडितपणे सुरु राहणार आहे. यावर्षी कोरोनाचे सावट असतानाही दत्तभक्तांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच हा सोहळा यशस्वी पार पडला. यापुढेही हा कार्यक्रम असाच भव्यदिव्य करण्याचा प्रयत्न राहील. – महेश मोरे, अध्यक्ष, अन्नछत्र ट्रस्ट