| मुंबई | प्रतिनिधी |
माणिकराव कोकाटे हे रम्मी खेळत असल्याच्या व्हिडीओमुळे अडचणीत आल्यानंतर त्यांच्याकडचं कृषी खातं दत्तात्रय भरणेंकडे देण्यात आलं. तर, भरणेंकडं असणारं क्रीडा खातं कोकाटेंना सोपवलं गेलं. मात्र, दत्तात्रय भरणेंना आता कृषी खात्याचा भार सोसवेना झालाय. इंदापूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना क्रीडा व अल्पसंख्यांक खात्यचं बरं होतं, लय त्रास नव्हता, असं विधान त्यांनी केलं आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं की, क्रीडा व अल्पसंख्यांक खात्याचं बरं होतं. लय त्रास नव्हता, पण आता त्रास घ्यावा लागेल. हा कृषी खातं त्रास नाही म्हणता येत, जबाबदारी आहे असं म्हणत त्यांनी आपल्या विधानावर सारवासारवही केली. दरम्यान, भरणेंना कृषी मंत्रीपद पेलवत नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.






