पनवेलची कन्या सायली ठाकूर डेप्युटी सीईओ

एमपीएससी परीक्षेत ओबीसीत प्रवर्गात प्रथम
। पनवेल । प्रतिनिधी ।

नेरे, ता.पनवेल येथील सायली श्याम ठाकूर महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत ओबीसी महिला प्रवर्गातून प्रथम आली असून तिची उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती झाली आहे. सायलीच्या उत्तुंग यशाबद्दल (बुधवारी (दि.20 जुलै) कु.सायली ठाकूर हिला पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.

पनवेल तालुका पोलीस ठाण्यात झालेल्या या सन्मान सोहळ्याप्रसंगी पोलीस निरीक्षक (गुन्हे) अंकुश खेडकर, सपोनि भोईर, सायली ठाकूर हिचे कुटुंबिय, पोलीस ठाण्यातील अधिकारीवर्ग आदी मान्यवर उपस्थित होते. सायलीच्या यशाबद्दल तिच्यावर पनवेल, नवी मुंबई सह संपूर्ण परिसरातून अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे. सायलीचे इयत्ता चौथीपर्यंत प्राथमिक शिक्षण नेरे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतून झाले. त्यानंतर इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण नवीन पनवेल येथील बांठीया हायस्कुल येथून पूर्ण केल्यानंतर पालीवाला महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून सायलीने बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यापुढे अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या सायलीने विश्‍वनिकेतून इन्स्टिट्यूट खालापूर येथून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेतून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करत घवघवीत यश संपादन केले.

समाजाप्रती आणि जनसेवेसाठी महत्वाकांक्षी असणार्‍या सायलीने लहानपणापासून शासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्या अनुषंगाने 2017 साली पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 2019 साली सायलीने एमपीएससीची परीक्षा देऊन मुलाखतीपर्यंत मजल मारली. त्यानंतर 2020 साली झालेल्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत यश संपादन करून सायलीची निवड करण्यात आली. 2020 साली झालेल्या मुख्य परीक्षेत 800 पैकी 534 गुण मिळवून संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी महिला प्रवर्गातून कु.सायली ठाकूर प्रथम आली असून तिची आता उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी निवड झाली आहे. यापुढे सायलीचे प्रशिक्षण होणार असून त्यानंतर पदावर नियुक्ती केली जाणार आहे. सायलीच्या या उत्तुंग यशाबद्दल तिचे वडील श्याम ठाकूर, आई उषा श्याम ठाकूर, बहिण शामली भगत व भाऊ उज्वल ठाकूर यांच्यासह गुरुजन व संपूर्ण कुटुंबियांचा मोलाचा वाटा आहे. सायलीचे वडील नोकरी करीत असून आई गृहिणी आहे. विशेष म्हणजे शासकीय सेवेत अधिकारीपदी नियुक्ती झालेली सायली ही तिच्या कुटुंबातील व पनवेलच्या ग्रामीण भागातील पहिलीच मुलगी आहे. सायलीने शासकीय अधिकारी व्हावे असे तिच्या आईवडिलांचे स्वप्न होते. त्यामुळे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना सायलीने एमपीएससीची तयारी सुरू केली. आई वडिलांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या बहिणीकडून प्रेरणा मिळाली असून आज खर्‍या अर्थाने कष्टाचे चीझ झाल्याची भावना सायलीने व्यक्त केली.

आपल्यातील क्षमतांचा वापर जनसेवेसाठी करावा या हेतूने शासकीय अधिकारी होण्याचे ठरवले आहे. एमपीएससी परिक्षेदरम्यान कुठेही क्लास लावला नसुन घरीच अभ्यास करीत होते. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अथक परिश्रम यामुळेच यशस्वी होऊ शकले. या माझ्या यशाचे श्रेय आई-वडील, बहीण, भाऊ, मार्गदर्शक, हितचिंतक यांच्यासह संपूर्ण कुटुंबियांना देते.

– सायली ठाकूर


Exit mobile version