सावित्रींच्या लेकींचा मापगाव येथे सन्मान

चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून मोफत सायकलींचे वाटप

| सोगाव | अब्दुल सोगावकर |

शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून मापगाव, ता.अलिबाग येथील मुलींना मोफत सायकलींचे वाटप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. मुलींच्या शिक्षणासाठी शेकापने नेहमीच प्रोत्साहन दिल्याचे यावेळी चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.


महिला दिनाचे औचित्य साधून बुधवारी चित्रलेखा पाटील यांच्या सौजन्याने मापगाव हद्दीतील सावित्रीच्या लेकींना विजय भगत यांच्या निवासस्थानी मुनवली-मापगाव येथे मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, रायगड जिल्हा पुरोगामी युवक संघटना अलिबाग तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, वरसोली ग्रामपंचायत सदस्य सुरेश घरत, थळ ग्रामपंचायत सदस्य सतिश म्हात्रे, मापगांव ग्रामपंचायत सदस्य विजय भगत, माजी ग्रामपंचायत सदस्य मज्जीद कुर, लाईक कप्तान, जगन्नाथ पाटील, जे. पी. घरत, जगदीश पाटील, प्रभाकर घरत, पांडुरंग सकरे, कुंभार, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रभाकर मोहिते, नथुराम थळकर, मैनुद्दीन अन्सारी, वजीर वाकनिस, रामकृष्ण मसुरकर, शिराज खान, मनीष म्हात्रे, प्रकाश गुळेकर व इतर मान्यवर यांसह सायकल लाभार्थी मुली व त्यांचे पालक आणि सदस्य, ग्रामस्थ व विभागातील शेकाप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांसमोर बोलताना चित्रलेखा पाटील यांनी सावित्रीबाई फुले व आंबेडकर या दोन व्यक्तीमत्वांनी भारत घडवण्यासाठी परिश्रम घेतले. भारत शिकला पाहिजे, ही त्यांची भूमिका होती आणि त्याच महनिय व्यक्तिमत्वांचा आदर्शन डोळ्यासमोर ठेवत शेकाप शैक्षणिक क्षेत्रात काम करीत आलेला आहे. समाज शिकला पाहिजे, मुलींना शिक्षण दिले पाहिजे ही शिकवण शेकापच्या ज्येष्ठांनी घालून दिलेली आहे. त्याच शिकवणीचा आमची पिढी पाठपुरावा करीत आलेली आहे. भविष्यातही रायगडात शिक्षण क्षेत्रात सर्वतोपरी सहकार्य करायला तयार असेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. मापगांव परिसरातील अनेक विकास कामे नृपाल पाटील यांच्या माध्यमातून झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी बोलताना विक्रांत वार्डे यांनी सांगितले की, चित्रलेखा पाटील यांना यांचं सायकल वाटप या स्तुत्य उपक्रमामुळे आधुनिक युगातील सावित्रीबाई असे संबोधले जाते. तसेच सायकल वाटपाचा हा कार्यक्रम सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे या उपक्रमाअंतर्गत चित्रलेखाताई पाटील यांनी सुरू केलेल्या उपक्रमाला सर्वत्र चांगला मिळत आहे, आज मापगांव हद्दीतील 77 गरजू मुलींना सायकल वाटप करत आहोत. चित्रलेखा पाटील यांनी आजपर्यंत 16909 गरजू मुलींना खेडोपाड्यात सायकलींचे वाटप केले आहे. त्यांचे 1 लाख गरजू मुलींना सायकल वाटप करून मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट आहे, असे सांगितले.

Exit mobile version