। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगावात एका अज्ञात चोरट्याने दिवसाढवळ्या घरफोडी करून ६६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व होंडा ऍक्टिव्हा स्कुटीचे आरसी कार्ड घेऊन पसार झाला आहे.
सदरील गुन्हा शुक्रवार दि.१४ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११:३० ते दुपारी १२:१० वाजण्याच्या दरम्यान घडला. याबाबतची फिर्याद वसंत शिवराम कानल (वय-४६) जे.बी.डी प्लाझा माणगाव मूळ रा.गोरेगाव वेस्ट मुंबई यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, कोणत्यातरी अज्ञात चोरट्याने आपल्याजवळील हत्याराने फिर्यादी वसंत कानल यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घराच्या बेडरूममधील कपाट फोडून त्यातील दोन कानातील सोन्याचे झुमके सुमारे १२ ग्राम वजनाचे अंदाजे ३६ हजार रुपये, कानातील सहा सोन्याचे झुमके सुमारे १० ग्राम अंदाजे ३० हजार रुपये, तसेच होंडा ऍक्टिवा स्कुटी क्रमांक एम.एच.४७/एए ९४६० या गाडीचे मूळ आरसी कार्ड, असा ऐवज घेऊन अज्ञात चोरटा फरार झाला आहे.
या गुन्ह्याप्रकरणी अज्ञात चोरट्या इसमांवर माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं.२९७/२०२२ भादवि संहिता कलम ३८०,४५४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वर हे करीत आहेत.