प्रवाशांना मात्र आर्थिक भुर्दंड
। तळा । वार्ताहर ।
राज्यात सुरू असलेल्या एसटीच्या संपामुळे सर्वत्र खाजगी वाहनांना सुगीचे दिवस आलेले आहेत. मात्र खाजगी वाहनांचे दर जास्त असल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागत आहे.
वेतनवाढ, महागाई भत्त्याचा व घर भाड्याचा फरक आणि एसटीचे विलिनीकरण या तीन मुद्यांवर महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटनेने संप पुकारला आहे. एसटी बंद असल्याने तळा बसस्थानकात मॅक्झिमो, मिनिडोअर, अॅपे, इको यांसारख्या खाजगी वाहनांची गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एसटी बस बंद असल्यामुळे तालुक्याबाहेर जाणारा नोकरदार वर्ग तसेच कामानिमित्त प्रवास करणारे प्रवाशी यांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. यांसह दिवाळीची सुट्टी संपल्यामुळे शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरू झाली आहेत. त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांना देखील महाविद्यालयात येण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. परंतु एसटीच्या दरापेक्षा खाजगी वाहनांचा दर अधिक प्रमाणात असल्यामुळे या सर्वांना जास्तीचे पैसे देऊन आर्थिक भुर्दंड सोसून प्रवास करावा लागत आहे.