थळ-डोंगरीत भरदिवसा घरफोडी; 10 लाखांहून अधिक किमंतीचा ऐजव लंपास

अलिबाग तालुक्यातील वाढत्या चोर्‍यांमुळे भीतीचे वातावरण
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यात गेल्या काही दिवसात चोर्‍या, घरफोडींचे प्रमाण वाढले असून वेश्‍वी मधील घरफोडीच्या घटनेच्या दोन-तीन दिवसातच थळमध्ये भरदिवसा झालेल्या घरफोडीत सुमारे 20 तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपयांपर्यंतची रोख रक्कम असा एकूण 10 ते 12 लाखापर्यंतचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. चोरट्यांनी खिडकीची काच फोडून घरात प्रवेश करीत कपाटातील ऐजव लंपास केला आहे. दिवसा उजेडी देखील चोरीच्या घटना घडू लागल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्रतिक घाडी, राहणार थळ-डोंगरी यांच्या घरात हा प्रकार शुक्रवार दि. 27 मे रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडला. प्रतिक घाडी हे थळ येथील आरसीएफ कंपनीत कामाला आहेत. कंपनीतून दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ते घरी गेले असता त्यांना घराच्या खिडकीची काच फुटलेली असल्याचे निदर्शनास आले. मात्र दरवाजाच्या कडीला असलेले टाळे मात्र तसेच होते. त्यामुळे त्यांनी टाळे उघडून घरात प्रवेश केला. तेंव्हा घरातील कपाट उघडे असलेले दिसले. तसेच कपाटातील वस्तू घरात अस्तावस्त पडलेले दिसले. त्यामुळे त्यांनी तातडीने अलिबाग पोलिस ठाण्यात फोन करुन याबाबतचीमाहिती दिली.

.

त्यानुसार लागलीच बीट मार्शल पोलिस अधिकारी यांनी घरी येऊन माहिती घेतली. चोरट्यांनी खिडकी उघडण्यासाठी कसल्यातरी मशिनच्या मदतीने लॉक कापण्यासाठी हिटरचा वापर केलेला आढळून आला. त्यानंतर खिडकीची काच फोडून आत प्रवेश केला. व कपाटाताील 20 तोले वजनाचे दागिने तसेच 1 लाखाहून अधिक रोख रक्कम लंपास केली आहे. घरातून बाहेर पडण्यासाठी पुन्हा चोरटयांनी दरवाजाच्या आतून जाळून लॉक उघडण्याचा देखील प्रयत्न केला असल्याचे दिसून येते. त्यात ते अयशस्वी झाल्याने परत गेले. अलिबाग पोलिसांनी ठसे तज्ज्ञांना पाचारण करुन संपूर्ण घरातील ठशांचे नमुने घेतले आहेत. यासंदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती. गेल्या काही दिवसात अलिबाग तालुक्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Exit mobile version