माथेरानच्या दरीत दाम्पत्यांचे मृतदेह

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानला भेट देण्यासाठी गेलेल्या रत्नागिरीतील राजापूर येथील दाम्पत्याचा माथेरान येथे दरीत मृतदेह आढळून आला. पार्थ काशिनाथ भोगटे (46) आणि त्यांची पत्नी श्रीलक्ष्मी पार्थ भोगटे (46), रा. राजापूर हे दाम्पत्य 11 जुलै रोजी माथेरानला गेले होते.

सायंकाळी दर्शनासाठी जात असल्याचे सांगून हे जोडपे हॉटेल ब्राइट लँडमधून निघाले होते. दुसर्‍या दिवशी हे जोडपे परतले नसल्याचे हॉटेल अधिकार्‍यांच्या लक्षात आले आणि त्यामुळे हॉटेल व्यवस्थापकाने पोलिसांना कळवले. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी या जोडप्याचे फोटो व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सवर प्रसारित केले आणि लोकांना सांगितले की, कोणी या जोडप्याला शोधत असेल तर त्यांना कळवा. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे जोडपे शेवटचे इको पॉईंटकडे जाताना दिसले आणि या जोडप्याचे शेवटचे लोकेशन दरीजवळ सापडले. माथेरानची सह्याद्री रेस्क्यू टीम तेव्हापासून या दाम्पत्याचा खोर्‍यात शोध घेत होती. 14 जुलै रोजी पार्थचा लहान भाऊ रुद्राक्ष काशिनाथ भोगटे (43) याने माथेरान गाठून माथेरान पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदवली.

सोमवारी बचाव पथकाने अखेर या जोडप्याचे मृतदेह लुईसा पॉइंट येथील दरीत सापडले. येथील लुईजा पॉईंट येथील 400 ते 500 फूट खोलदरीमध्ये हे मृतदेह असल्याने त्यांना बाहेर काढणे म्हणजे एक दिव्यच होते; परंतु माथेरान रेस्क्यू टीमच्या मदतीने हे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
रेस्क्यू टीमच्या सदस्य वैभव नाईक, सुनील कोळी, उमेश मोरे, अमित कोळी, अमोल सकपाळ, सुनील ढोले, महेश काळे, अजिंक्य सुतार, सुरेश, त्याचप्रमाणे पोलीस शिपाई श्री. गायकवाड, गर्जे, गणेश गिरी, दामोदर खतेले यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून मृतदेह बाहेर काढले. या घटनेची नोंद माथेरान पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी करण्यात आली आहे. अधिकचा तपास सपोनि अनिल सोनोने, तपासिक अंमलदार गणेश गिरी, दाखल अंमलदार आर.व्ही. रामदास व इतर पोलीस करीत आहेत.

Exit mobile version