। मुंबई । प्रतिनिधी ।
दादर स्थानकात तुतारी एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी निघालेल्या दोन प्रवाशांकडील सुटकेसमध्ये एक मृतदेह आढळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. दादर रेल्वे स्थानकात रविवारी (दि.04) मध्यरात्री तुतारी एक्स्प्रेसमध्ये फलाट क्रमांक 11 वर कोकणात जाणारी तुतारी एक्स्प्रेस उभी होती. या गाडीच्या सर्वसाधारण डब्यात दोन तरुण मोठी बॅग चढवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांच्याकडे असलेली मोठी बॅग त्यांना काही केल्या उचलता येत नव्हती. राज्य रेल्वे पोलीस दलाचे अंमलदार माधव केंद्रे आणि रेल्वे सुरक्षा बलाचे जवान संतोषकुमार यादव यांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना बॅगेवर रक्ताचे डाग आढळले. पोलिसांनी तरुणास बॅग उघडण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी नकार दिला. त्यामुळे पोलिसांनीच ती बॅग उघडून पाहिली असता त्यात रक्ताने माखलेला मृतदेह आढळला. त्यानंतर एकाने तिथून पळ काढला तर दुसऱ्या पळ काढण्याच्या तयारीत असताना मोठ्या शिताफीने एकाला ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या आरोपी जय याने चौकशीत सांगितले की, जय, अर्शद आणि शिवजित सिंग हे मित्र असून तिघेही मूकबधिर आहेत. त्यांनीच पायधुनी येथे मित्र अर्शद खान (30) याची हत्या करुन मृतदेह बॅगेत टाकला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ते तुतारी एक्स्प्रेसमधून नेत होते. प्रवासात एखाद्या पुलावरुन ही बॅग ढकलण्याचा त्यांचा प्लान होता.
याप्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून जायचा साथीदार शिवजीत कुमार सिंह याची माहिती घेऊन त्याला उल्हासनगर येथून अटक केली. तसेच, गुन्ह्यांत वापरलेले हत्यारही पोलिसांनी जप्त केले आहे.