पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मृत साप

। नेरळ। वार्ताहर ।

नेरळ गावातील स्टेशन आळीमधील गंगुबाई चाळीमध्ये येणार्‍या जलवाहिनीमध्ये मृत साप आढळून आला. नळाला पाणी येत नसल्याने स्थानिकांनी ग्रामपंचायत कर्मचारी यांना बोलावून पाण्याचे लिकेज शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरदेखील पाणी कुठे गायब होते. याचा शोध लागत नव्हता. शेवटी मुख्य जलवाहिनी खोलून बघितली असता त्यात तीन फूट लांबीचा मृत साप आढळून आला आहे. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतीच्या या कारभाराबद्दल नेरळ ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत.

नेरळ रेल्वे स्टेशन हद्दीत असलेल्या गंगुबाई चाळ भागातील रहिवाशी यांना तीन दिवस पाणी येत नव्हते. त्यामुळे स्थानिक रहिवाशी यांनी पाणी येत नसल्याने नेरळ ग्रामपंचायतीकडे तक्रार केली. प्रभाग दोनमधील विद्यमान सदस्य शारदा साळेकरदेखील याच परिसरात राहतात. पाण्याच्या वाहिनीला कुठे लिकेज असतील आणि त्यामुळे पाणी येत नसेल असे सर्व रहिवाशी यांना वाटले होते. मात्र, पाईपलाईन कोठे लिकेज आहे का, याची चाचपणी केली असता कुठेही पाईपलाईन फुटली नव्हती.

शेवटी गंगुबाई चाळीकडे येणारी जलवाहिनी उघडून बघण्याचा निर्णय ग्रामपंचायत कर्मचारी यांनी घेतला. त्यावेळी स्थानिक रहिवाशी पाईपलाईन खोलून झाल्यावर अक्षरशः हैराण झाले. साधारण तीन ते साडे तीन फूट लांबीचा मृत साप त्यावेळी त्या जलवाहिनीमधून बाहेर काढण्यात आला.

Exit mobile version