। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानच्या घनदाट जंगलात जंगली डुक्कर मृत अवस्थेत आढळले असून एका बंगल्याच्या कुंपणा शेजारी जंगली डुक्कर मृत अवस्थेत सापडल्याने जंगली प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
माथेरान पर्यटनस्थळाच्या डोंगरमाथ्यावर 300 हेक्टर टापुमध्ये घनदाट जंगल आहे. उंच घनदाट वृक्षराजीने माथेरान हिरवेगार दिसत असते. जंगलामुळे जंगली प्राणीसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामध्ये जंगली डुक्करांचे कळपसुद्धा याठिकाणी पाहणीत आले आहेत. दुपारच्या सुमारास एक जंगली डुक्कर मृत अवस्थेत आढळून आले. ही माहिती वन विभागाच्या अधिकार्यांना समजताच वनरक्षक, वनमजूर हे सर्व घटनास्थळी हजर झाले. त्यांनी पशुधन अधिकार्यांना बोलावून त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. या जंगली डुक्कराला कशामुळे प्राण गमवावे लागले हे समजू शकले नाही.
माथेरानमध्ये 256 एम पी प्लॉटस आहेत. यातील काही बंगल्याना कुंपणे घातली आहेत. कुठे दगडाचे तर कुठे तारांचे कुंपण आहेत. हे बंगले काही भागात जवळजवळ असल्याने त्याठिकाणी कुंपण दिसत आहेत. यामुळे जंगली प्राण्यांना वावरण्यास अडचणी निर्माण होताना दिसत आहे. त्यामुळे ही बंगल्याची कुंपणे जंगली प्राण्यांच्या जीवावर उठत आहेत की काय? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.