दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी
| तळा | प्रतिनिधी |
तळा बसस्थानकाच्या उघड्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, बसस्थानकाचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे. बसस्थानकासमोरील काँक्रिटीकरण, संरक्षक भिंत, शौचालय व त्यावरती विश्रांती खोली असे बसस्थानकाच्या कामाचे स्वरूप असून, गणेशोत्सवापूर्वी काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्यात येऊन याठिकाणी एसटीची वाहतूक सुरू झाली. मात्र, बाजूलाच शौचालयासाठी एक मोठा खड्डा व संरक्षक भिंतीसाठी सहा मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत.
गणेशोत्सवानंतर उर्वरित कामाला सुरुवात करण्यात येईल, असे संबंधित ठेकेदाराकडून सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्याने या खड्ड्यांमधून पाणी, प्लास्टिक पिशव्या, बॉटल्स विविध प्रकारचा कचरा साचून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे डासांची पैदास होऊन साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. तसेच हे खड्डे उघड्या अवस्थेत असून, आजूबाजूला लोखंडी सळ्या पसरल्या असल्याने रात्रीच्या वेळी याठिकाणी अपघात घडून जीवितास धोका संभावण्याची शक्यता नाकारता येत नाही.शौचालयाचे काम अपूर्ण असल्याने येथील प्रवाशांचीदेखील मोठी गैरसोय होत आहे. शिवाय, अपुऱ्या कामामुळे बसचालकाला बस लावताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अपुऱ्या कामामुळे अशा अनेक समस्या भेडसावत असल्याने संबंधित ठेकेदाराने तळा बसस्थानकाचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी तळावासीयांकडून केली जात आहे.
