मोरीचे बांधकाम धोकादायक; प्रवासी, वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
| म्हसळा | प्रतिनिधी |
गोरगरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे माजी मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले यांच्या जन्मगावी असलेल्या आंबेत येथील बसस्थानक परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या महाड-रायगड विभागातील या बसस्थानकात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी बांधण्यात आलेली मोरी उघडी पडली असून, तिच्यावर ठेवलेले लोखंडी जाळेही विस्कटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे प्रवासी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या बस स्थानकात ये-जा करणाऱ्या एसटी बस तसेच इतर वाहनांची मोठी वर्दळ असते. आंबेत बसस्थानक हे रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारे महत्त्वाचे प्रवेशद्वार मानले जाते. असे असतानाही येथे उघडी पडलेली मोरी आणि नादुरुस्त जाळे उघड्या डोळ्यांनी दिसत असूनही संबंधित यंत्रणा मात्र त्याकडे दुर्लक्षकरत असल्याची तीव्र नाराजी स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
मोरीचे झाकण नीट बसवलेले नसून काही ठिकाणी ते पूर्णपणे बाजूला झाले आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा गर्दीच्या वेळी चालकांचे लक्ष न गेल्यास वाहनाचे चाक मोरीत अडकण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरात अक्षरशः जीवघेणा सापळा निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. याशिवाय बसस्थानकाच्या आवारातील रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डाही पडलेला आहे. त्यामुळे बस तसेच इतर वाहनांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत असून, प्रवाशांनाही मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. या गंभीर प्रकाराकडे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन मोरीची दुरुस्ती करावी आणि बसस्थानक परिसर सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक रहिवासी व समाजसेवक नरेश सावंत यांनी केली आहे. अन्यथा भविष्यात एखादा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशासनावरच राहील, असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.







