माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गंभीर आरोप
| मुंबई | प्रतिनिधी |
देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलतात, अशी टीका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. तसेच परमवीर सिंह आणि फडणवीस यांच्या डील झालं होतं, असा आरोपही देशमुख यांनी केला आहे.
अनिल देशमुख यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. चांदीवाल अहवाल महायुती सरकारने का जाहीर केला नाही, असा सवाल देशमुख यांनी विचारला होता. तेव्हा हा अहवाल महाविकास आघाडीचे सरकार असताना सादर झाला होता, असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. पण, तो अहवाल जाहीर होण्यापूर्वी 40 आमदारांना 50 कोटी रुपये देऊन फडणवीसांनी सरकार पाडलं, असा आरोप देशमुखांनी केला.
परमवीर सिंह प्रकरणी देशमुख म्हणाले की, मी जेव्हा गृहमंत्री होतो, तेव्हा परमवीर सिंह पोलिस आयुक्त होते आणि फडणवीस विरोधी पक्षनेते होते, असा दावा फडणवीसांनाी केला होता. मी परमवीर सिंहाना देशमुखांवर आरोप करा असे मी कसे काय सांगू शकतो, असे फडणवीस म्हणाले होते. पण, मी गृहमंत्री होतो तेव्हा मुकेश अंबानींच्या घरासमोर एका स्कॉर्पियोमध्ये स्फोटकं ठेवली होती. नंतर त्या गाडी मालकाची हत्या झाली होती. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये मुंबई पोलिसांचे तत्कालीन आयुक्त परमवीर सिंह हे मास्टरमाईंड होते. सिंह यांना एनआयएकडून अटक होणर होती. तेव्हा परमवीर सिंह आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली. परमवीर सिंह फडणवीसांना शरण गेले आणि या गुन्ह्यात मला अटक करू नका, अशी विनंती केली. तेव्हा आमचं सरकार पाडण्यासाठी फडणवीसांनी सिंह यांना माझ्यावर आरोप करायला सांगितलं. फडणवीस आणि सिंह यांच्यात अशी डील झाली होती, त्यामुळेच सिंह यांनी माझ्यावर आरोप लावले होते.