शॉक लागून मृत्यूप्रकरण! संबंधित अधिकार्‍यावर कारवाईची मागणी

| पनवेल । वार्ताहर ।

गणेश विसर्जनप्रसंगी शॉक लागून झालेल्या दुर्घटनेशी संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करावी, तसेच पनवेल महानगरपालिकेत विद्युत अभियंत्याची नेमणूक करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्ष महानगरपालिका क्षेत्राचे कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोळीवाडा विसर्जन घाटावर दहा जणांना विजेचा जोरदार धक्का लागला होता. दहा जणांपैकी आठ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तर दोघांना अत्यावश्यक विभागातमध्ये ठेवून उपचार देण्याची गरज भासली. महानगरपालिकेने नेमलेल्या ठेकेदाराच्या विद्युत जनरेटरमधील बिघाडामुळे हि दुर्दैवी घटना घडली. मर्जीतील अधिकारी म्हणून पालिकेचे वरिष्ठ अधिकारी या अभियंत्याला पाठीशी घालत असून या घटनेत गणेशभक्तांच्या जीवाशी खेळ खेळून त्यांच्या जीवितास हानी पोहचविण्यास जबाबदार असलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करावी. तसेच भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी महानगरपालिका क्षेत्रात अभियंत्याची नेमणूक करावी, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे.

Exit mobile version