हा दाह सोसवेना….

पशुपक्ष्यांची अन्नासाठी वणवण; मृत्यू वाढण्याची शक्यता

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

वैशाख वणव्याने धरती तप्त झाली आहे.सगळीकडे रखरखणारे उन्ह… या उन्हात कोरड पडलेल्या घशाला पाण्याचा घोट मिळावा म्हणून मानवासह पशु, पक्ष्यांची चाललेली धडपड… उन्हाच्या तीव्रतेने शुष्क पडलेली झाडे,झुडपे यामुळे नैसर्गिक खाद्यच मिळणे बंद झाल्याने निसर्गात वास्तव्य करुन राहणार्‍या पशुपक्ष्यांची अन्न मिळविण्यासाठी चाललेली जीवघेणी धडपड… ती करताना होणारे मृत्यू असे भयावह चित्र सध्या सगळीकडे दिसत आहे. अन्नाच्या शोधात फिरणारे शेकडो पशु,पक्षी उन्हाळ्यात रस्त्यावर, माळरानावर तडफडताना दिसत आहेत.

जिल्ह्यात सध्या उन्हाची काहिली व तीव्रता वाढत आहे. या वाढत्या तापमानाचा फटका पक्षांना जास्त बसत आहे. अशातच डोंगर माळरानावर लागणारे वणवे घातक ठरत आहेत. त्यांची दाणा-पाण्यासाठी दाही दिशा वणवण होत आहे. यासाठी मानवी वस्तीत देखील येत आहेत. भूक-आणि पाण्यावाचून तसेच यातून येणार्‍या तणावातून पक्ष्यांचे मृत्यू होण्याची शक्यता पक्षी अभ्यासक व तज्ञांनी व्यक्त केली आहे.

विळे पाटणूस भागात नुकत्याच अशा प्रकारच्या दोन घटना घडल्या होत्या. पाण्यासाठी वणवण फिरत असतांना पिवळ्या डोळ्याचा सातभाई नावाचा पक्षी भर दुपारी अज्ञात वाहनांच्या धडकेने जखमी झालेला अभ्यासक राम मुंढे यांना आढळला होता. त्यानंतर हा पक्षी दगावला. अशा घटना सतत घडत आहेत. सध्या उन्हाची तीव्रता जास्त वाढत असल्यामुळे आणि वाढत्या तापमानामुळे पशु पक्षी व इतर पिल्लांच्या शरीरातील पाणी कमी होते आणि त्या पिल्लाला त्रास होतो त्यामुळे ते पिल्ल सावलीचा आसरा घेतात. असे मुंढे यांनी सांगितले. पिल्लांच्या अंगावर पाणी टाकले तसे ते थोडे सावध होतात आणि झाडाच्या फांदीवर जाऊन बसतात.पंखांना पसरवून हालचाल करून निघून जातात. आपल्या भागात अशा घटना घडत असतील तर माणगाव वनविभाग यासंदर्भात सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्‍वासन वनविभागाने दिले.

सध्या घारीची पिल्लं घरट्यातून बाहेर पडतात. आधीच उन्हाळ्याचे दिवस आणि त्यात त्यांचे घरट्याच्या बाहेर पडणे त्यामुळे ते विचलित होतात आणि अशातच या पिल्लाला उन्हाचा त्रास व पाणी न मिळाल्याने ते जास्त बिथरले जातात, असेच इतरही पक्ष्यांच्या बाबतीत घडते.

राम मुंढे, पक्षी अभ्यासक

उन्हे वाढू लागल्याने पक्षु-पक्ष्यांची पाणी आणि अन्नासाठी भटकंती वाढली आहे. तसेच सावलीची देखील आवश्यकता लागते. हे मिळविण्याच्या खटाटोपात पक्षी तणावात (स्ट्रेस) जातात आणि त्यांचा मृत्यू ओढावतो. लोकांनी आपल्या घराच्या छपरावर, अंगणात किंवा झाडावर थोड्या पाण्याची व दाण्याची थोडी व्यवस्था केली तरी त्यांचा जीव वाचू शकतो. तसेच जंगलातील नैसर्गिक व कृत्रिम पाण्याचे स्रोत व पाणवठयामध्ये पाण्याची व्यवस्था केली पाहिजे.

डॉ. प्रशांत कोकरे, पशुधन विकास अधिकारी, सुधागड
Exit mobile version