क्रांतीसिंह नानासाहेब पुरोहितांच्या पत्नी शांताबाई पुरोहित यांचे निधन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी क्रांतिसिंह म्हणून ओळखले जाणारे महाडचे माजी आमदार नानासाहेब पुरोहित यांच्या पत्नी शांताबाई नानासाहेब पुरोहित यांचे बुधवारी (दि.21) सकाळी 10.20 वाजता अलिबागजवळच्या थळ या गावी निधन झाले. निधन समयी त्यांचे वय 94 होते.

सन 2004 पासून शांताबाई पुरोहित या त्यांच्या कन्या अर्पीता अरविंद रानडे आणि जावई मेजर अरविंद रानडे यांच्या थळ येथील निवासस्थानी मुक्कामी होत्या. गेल्या आठ दिवसांपासून त्यांना काहीसा त्रास जाणवत होता.

शांताबाई पुरोहीत यांचा जन्म महाड येथील शेट या सुखवस्तू कुटूंबात झाला. बालपण व शिक्षण देखील त्यांचे महाड येथेच झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात स्व. नानासाहेब पुरोहित यांच्याबरोबर त्यांचा प्रेमविवाह झाल्याची आठवण त्यांच्या कन्या अर्पिता अरविंद रानडे यांनी सांगितली. शांताबाई यांच्या वडिलांचा त्याकाळी महाडमध्ये बेकरी व्यवसाय होता आणि ते देखील स्वातंत्र्यलढ्यात अग्रणी होते.

वडिलांनी देखील 1942 मध्ये कारावास भोगला होता. शांताबाईनी देखील स्वातंत्र प्राप्तीसाठी आपल्याकडून शक्य तितके योगदान सातत्याने दिले. त्याकाळात महाड व परिसरात वैद्यकीय सुविधा विकसित झाल्या नव्हत्या. परिणामी, शांताबाई या महाड परिसरातील गरोदर महिलांची प्रसुती त्यांच्या घरी जाऊन करीत. त्यांनी आपल्या उमेदीच्या काळात 20 हजारापेक्षा अधिक महिलांच्या घरी रात्री-अपरात्री जाऊन प्रसुती करुन देण्याचे अनन्यसाधारण काम केले असल्याची आठवण देखील त्यांच्या कन्या अर्पीता रानडे यांनी सांगितली.

नानासाहेबांचे 27 नोव्हेंबर 1994 रोजी निधन झाले. त्यानंतर अवघ्या 42 व्या वर्षी पूत्र राजन यांचे अकाली निधन झाले. हे दोन्ही मोठे धक्के शांताबाईंनी मोठ्या धीराने सोसले. त्यानंतर शांताबाई सन 2004 पासून थळ येथेच मुक्कामी असल्याचे कन्या अर्पिता रानडे यांनी सांगितले.

Exit mobile version