राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भाजप आणि करणी सेनेच्या एका कार्यकर्त्याने आज एका व्हिडिओद्वारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना शिवीगाळ करणाऱ्या काँग्रेसच्या 25 खासदारांची गोळ्या घालून हत्या करण्याची धमकी दिली. या धमकीसाठी संसदीय कामकाज मंत्री किरण रिजीजू यांना जबाबदार ठरवून काँग्रेसच्या नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

भारताच्या सुरक्षेसाठी राहुल गांधी सर्वांत धोकादायक व्यक्ती असल्याचे विधान करून रिजीजू यांनी जनभावना भडकवल्या आहेत. हा सुनियोजित आणि कपटपूर्ण कटाचा भाग असून, रा. स्व. संघ-भाजप म्हणजे एक गोडसे फॅक्टरी असल्याचा आरोप काँग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेडा यांनी केला. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदारांना गोळ्या घालून जिवे मारण्याची व्हिडिओवर धमकी देणाऱ्याचे नाव राज आमेरा असून तो राजस्थानच्या कोटा येथील रहिवासी आहे. राहुल गांधी हे देशासाठी सर्वांत धोकादायक व्यक्ती आहेत. ते नक्षलवादी, कट्टरपंथी आणि जॉर्ज सोरोससारख्या लोकांच्या संपर्कात असतात.

संसदेतील त्यांचे वर्तन आक्षेपार्ह आणि बेजबाबदारपणाचे असते, असे विधान किरण रिजीजू यांनी बुधवारी केले होते. रिजीजू यांचे वक्तव्य ऐकून आणि संसदेत राहुल गांधी यांच्या इशाऱ्यावरून काँग्रेसच्या 25 खासदारांनी ओम बिर्ला यांना शिवीगाळ केल्यामुळे आम्ही भाजप आणि करणी सेनेचे कार्यकर्ते संतप्त झालो आहोत. या घटनेची पुनरावृत्ती झाल्यास राहुल गांधी यांना घरात घुसून गोळ्या घालू.

काँग्रेसच्या 25 खासदारांना 24 तासांच्या आत अटक झाली नाही तर त्यांनाही गोळ्या घालू, अशी धमकी देणारा व्हिडिओ आमेराने प्रसारित केला आहे. पुढील घटनांची जबाबदारी प्रशासनावर असून या विधानामुळे तुरुंगात जावे लागले तरी बेहत्तर, असेही त्याने म्हटले आहे. पंतप्रधान मोदी आणि ओम बिर्ला यांच्या छायाचित्राच्या पार्श्वभूमीवर आमेराने दिलेल्या धमकीचा व्हिडिओ पवन खेडा यांनी एक्सवर टाकला आहे. हा विषारी संस्कृतीचा परिणाम या धमकीवर काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी जोरदार टीका केली आहे.

संसदेपासून ते राजकीय सभांपर्यंत देशाच्या राजकीय चर्चेत भाजपने निर्माण केलेल्या द्वेष आणि सूडाच्या विषारी संस्कृतीचा हा थेट परिणाम आहे. भाजप नेते आपल्या राजकीय विरोधकांना कट्टर शत्रू मानतात आणि द्वेषाने आंधळे झालेल्या कार्यकर्त्यांना विरोधी नेत्यांना घाबरवण्यासाठी मोकाट सोडतात. पण राहुल गांधी हे इंदिरा आणि राजीव गांधी यांच्या वारशातून आलेले आहेत. त्यांनी आपल्याला डरो मत हा नारा दिला आहे, हे भाजप-संघाने विसरू नये. अशा ट्रोलिंगमुळे राहुल गांधी घाबरणार नाहीत आणि प्रत्येक विरोधकाला थेट व निर्भीडपणे सामोरे जात राहतील, असे वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.

Exit mobile version