| डोंबिवली | वृत्तसंस्था |
मुंबई- डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटामधील मृतांचा आकडा वाढला आहे. आज सकाळी बचावपथकाला आणखी तीन मृतदेह आढळले आहेत. त्यामुळे एकूण मृतांची संख्या अकरा झाली आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अद्याप घटनास्थळी शोध मोहीम सुरु आहे. गुरुवारी अमुदान या केमिकल कंपनीत आग लागली. बॉईलरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. आग इतर कंपन्यांमध्ये देखील पसरली. स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजुच्या रहिवाशी इमारतीच्या काचा देखील फुडल्या. तीन ते चार किलोमीटर अंतरावर स्फोटामुळे हादरा जाणवला होता. यावरुन स्फोटाची तीव्रता समजू शकेल. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले होते. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अथक परिश्रमानंतर रात्री आग विझवण्यास अग्निशमन दलाला यश आले. या दुर्घटनेमध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याचे काल समोर आले होते. आज बचावपथकाला आणखी तीन मृतदेह आढळले आहेत. बचावपथकाची शोधमोहीम सुरुच असून अजून काही कामगार मलब्याखाली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.