। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
नेपाळमध्ये बुधवारी (दि.26) आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवितहानी झाली असून, पोलिसांच्या माहितीनुसार मृतांचा आकडा 547 वर पोहोचला आहे. नुवाकोट जिल्ह्यातील विदूर नगरपालिकेच्या देवीघाट परिसरासह अनेक भागांना पुराचा मोठा फटका बसला. अनेक घरे चिखलात गाडली गेली असून, मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या माहितीनुसार, 27 ऑगस्टपर्यंत 823 जणांशी संपर्क होऊ शकलेला नव्हता. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, भूस्खलनामुळे तयार झालेल्या सरोवराचा नैसर्गिक बांध फुटण्याचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, सरोवराचा बांध फुटल्याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नसल्याचे नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेने स्पष्ट केले आहे. या पुराबाबत नेपाळ किंवा चीनकडून आधी कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, काठमांडूतील चीनच्या दूतावासाने हे आरोप फेटाळून लावत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, चीनचे पंतप्रधान ली चियांग यांनी तिबेटमधील मोठ्या नुकसानीची दखल घेत मदत आणि बचावकार्याचे आदेश दिले आहेत.
Nepal Flood Update: मृतांचा आकडा वाढला
