अंत्यसंस्कारासाठी तीन किलोमीटर अंतर पायपीट
| पनवेल | वार्ताहर |
तळोजा वसाहतीमध्ये स्मशानभूमीची सोय नसल्यामुळे रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. अंत्यसंस्कारासाठी तीन किलोमीटर अंतर पायपीट करून खारघर येथील स्मशानभूमीत जावे लागत असल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.
तळोजा वसाहतीमध्ये विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. वसाहत निर्माण होण्यापूर्वी येथील खाडीकिनारी पेठाली ग्रामस्थांची स्मशानभूमी होती. मात्र त्याची दुरवस्था झाली आहे, तर सेक्टर पंधरा येथे अन्य धर्मियांसाठी अंत्यविधीसाठी सिडकोने भूखंड उपलब्ध करून दिला आहे. मात्र स्मशानभूमीकडे दुर्लक्ष केल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे. तळोजा वसाहतीच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तळोजा फेज एक आणि दोन मिळून लोकसंख्या एक लाखाच्या घरात आहे. मात्र स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अंत्यविधीसाठी नागरिकांना तीन किलोमीटरची पायपीट करून खारघर गाठावे लागत आहे. पनवेल पालिका प्रशासनाने तळोजा वसाहतीमधील रहिवाशांसाठी स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
संजय कटेकर,
तळोजा फेज एक सेक्टर पंधरामध्ये नुकताच सिडकोकडून स्मशानभूमीसाठी भूखंड प्राप्त झाला आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून बांधकाम हाती घेण्यात येणार आहे.
शहर अभियंता, पनवेल महापालिका