| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंडीतला रस्ता दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे. रस्त्याच्या कडेला साचलेली धूळ व मातीमुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावर ओव्हरलोड अवजड वाहने, प्रवासी वाहतूक आणि दुचाकींची सतत वर्दळ असते. मात्र कडेला साचलेल्या मातीवरून घसरून अनेक दुचाकीस्वारांचे अपघात झाले आहेत. काहींना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग वाहतूक पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. अपघात झाल्यानंतरच हालचाल होते, अशी नागरिकांची नाराजी आहे. या ठिकाणी तातडीने रस्ता स्वच्छता, धोकादायक भागांची दुरुस्ती आणि देखरेख गरजेची आहे. तसेच वेग मर्यादा दर्शविणारे स्पष्ट फलक व इशारा फलक लावणे अत्यावश्यक आहे. आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासन कायमस्वरूपी उपाययोजना करणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.






