तीन डंपर चालकांविरुध्द कारवाई
| पनवेल | वार्ताहर |
सिडकोने संपादित केलेल्या जमिनीवर आणि भूखंडावर मानवी आरोग्यास धोकादायक आणि पर्यावरणास हानिकारक असलेले डेब्रीज टाकणार्या डंपर चालकांची सिडकोकडून धरपकड सुरुच आहे. सिडकोच्या पथकाने गव्हाण येथील एमटीएचएल लेबर कॅम्पलगत डेब्रीज टाकण्याच्या तयारीत असलेल्या 3 डंपरवर कारवाई करुन ते जप्त केले आहेत. तसेच सदर डंपरवरील चालकांना ताब्यात घेतले आहे.
सिडकोने संपादित केलेल्या भूखंडावर अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात डेब्रीज टाकण्यात येत असून, सदरचे डेब्रीज मानवी आरोग्यास धोकादायक आणि पर्यावरणास हानिकारक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सिडकोच्या भूखंडावर टाकण्यात येणार्या अनधिकृत डेब्रीजला आळा घालण्याच्या दृष्टीने सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली दक्षता तपास अधिकारी, सुरक्षा विभाग, अभियांत्रिकी विभाग आणि पोलीस पथकाकडून सिडकोच्या जमिनीवर अनधिकृतपणे डेब्रीज टाकणार्या डंपर चालकांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. गव्हाण येथील एमटीएचएल लेबर कॅम्पलगत सिडकोच्या जमिनीवर मानवी आरोग्यास हानिकारक असलेले डेब्रीज टाकण्यात येत असल्याची माहिती सिडकोच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सिडकोच्या पथकाने गव्हाण येथे धाव घेतली असता, त्याठिकाणी तीन डंपरमधील मानवी आरोग्यास आणि हानिकारक असलेले डेब्रीज विनापरवाना खाली करण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यानंतर सिडकोच्या पथकाने तिन्ही डंपर ताब्यात घेऊन डंपर चालक इरसाद झियाउद्दीन शेख, अकील शकील अहमद, शकील अहमद मोहम्मद सुल्तान अन्सारी यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर सिडकोच्या पथकाने बेकायदेशीरपणे डेब्रीज टाकणार्यांविरुद्ध उलवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.







