लग्नाच्या प्रलोभनातून ज्येष्ठाची फसवणूक

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
घटस्फोटितांचे लग्न जुळविणार्‍या साईटवरून लग्नासाठी वधू शोधणे नेरूळमधील एका ज्येष्ठ नागरिकाला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी दोन महिलांविरोधात फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सीवूड्स भागात राहणार्‍या एका ज्येष्ठ नागरिकाला स्वतःचा सांभाळ करण्यासाठी एका महिला सहचारिणीची आवश्यकता असल्याने त्यांनी घटस्फोटितांसाठी असलेल्या डायव्होर्स मेट्रोमनी या वेबसाईटवर अकाऊंट तयार केले होते.
त्यानंतर जुलै महिन्यात आलीया विल्यम नावाच्या महिलेने ज्येष्ठ नागरिकासोबत संवाद साधून स्वतःची माहिती व्हॉट्सअवर पाठवून दिली होती. त्यानंतर या दोघांमध्ये फेसबुकवरून चॅटिंग सुरू झाल्यानंतर आलीया हिने ती लंडन येथे राहण्यास असल्याचे व त्यांच्यासोबत लग्न करण्यास तयार असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर तिने काही अत्यावश्यक कागदपत्रे व ब्रिटिश पाऊंडचे पार्सल त्यांच्या घरी पाठवत असल्याचे सांगून त्यांच्याकडून घरचा पत्ता व फोन नंबर मागून घेतला होता. तसेच काही दिवसांतच सविता शर्मा नामक महिलेने कस्टम अधिकारी असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाला संपर्क साधत पार्सल सोडविण्यासाठी पैशांची मागणी केली होती. अशाप्रकारे जवळपास 5 लाख 65 हजारांची रक्कम उकळण्यात आली. मात्र त्यानंतरदेखील सविता शर्मा वेगवेगळी कारणे सांगून पैशांची मागणी करत असल्याने फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर नेरूळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

Exit mobile version