| अलिबाग | प्रतिनिधी |
पालकमंत्रीपद हे घटनेने निर्माण केले आहे. जिल्ह्यात पालकमंत्री असणे आवश्यक आहे. लवकरच हा निर्णय झाला पाहिजे, असे मत खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.
रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रीपद गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादीमध्ये या पदावरून रस्सीखेच सुरू आहे. पालकमंत्रीपदावरून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. शिंदे गटातील शिवसेनेचे भरत गोगावले यांनाच पालकमंत्रीपद मिळावे म्हणून स्वतः रोजगारहमी मंत्री भरत गोगावले, आ. महेंद्र दळवी, आ. महेंद्र थोरवे हे तिघेजण तटस्थ भूमिकेत आहेत. आमचे आमदार जास्त म्हणून शिवसेनेलाच पालकमंत्रीपद मिळावे म्हणून राष्ट्रवादीला आव्हान देत आहेत.
जिल्ह्यातील पालकमंत्रीपदावरून राजकारण तापले आहे. मात्र, त्याचा परिणाम जिल्ह्यातील विकासावर होत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकाही रखडल्या आहेत. जिल्हा नियोजन समितीचा निधी ही वितरीत करण्याचा अधिकारी राज्य पातळीवर राहणार आहे. त्यामुळे हा वाद अधिकच विकोपाला गेला असल्याचे चित्र आहे. पालकमंत्रीपदावरून सोमवारी तटकरे यांना विचारणा केली असता, पालकमंत्रीपद हे घटनेने निर्माण केले आहे. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री यांची महत्त्वाची भूमिका असते. पालकमंत्रीपद कोणाला द्यायचे हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठरवतील. यावर लवकरच निर्णय झाला पाहिजे, असे मत खा. तटकरे यांनी व्यक्त केले. त्यामुळे सरकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. जिल्ह्यात आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद मिळू नये, म्हणून शिंदे गटातील तिन्ही नेते जिवाची बाजी लावत आहे. हे पद भरत गोगावले यांना मिळावे, यासाठी शिंदे गटातील आमदारही शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. परंतु, कोणाच्या गळ्यात पालकमंत्रीपदाची माळ पडेल, हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या निर्णयानंतर ठरणार आहे.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
अलिबाग तालुक्यातील बेलोशी आणि मानतर्फे झिराड येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पक्षप्रवेश सोहळा सोमवारी राष्ट्रवादी भवनमधील सभागृहात झाला.
बेलोशी विभागातील काँग्रेसचे नेते, अलिबाग पंचायत समितीचे माजी सदस्य श्रीधर भोपी, बेलोशीच्या माजी सरपंच कविता पाटील, भाविका गावंड, उज्ज्वला सांदणकर, गीतांजली पारंगे, वर्षा काटले, प्रचिती पाटील, गिरीश पाटील, रामचंद्र पारंगे, संदीप भोईर, प्रशांत काटले, नंदकुमार काटले, सतीश पाडगे, सुधीर शिर्के, सुरेश पाटील, अनंत लोहार, लक्ष्मण शेळके, सूनील भोईर, शुभम पाटील, उदय सांदणकर आदींसह मानतर्फे झिराडमधील उपसरपंच राकेश पाटील, दर्शन म्हात्रे, प्रसाद नाईक, बंडू घरत, अंकिता भगत यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.







