। श्रीवर्धन । वार्ताहर ।
दुर्मिळ, तसेच अतिसंरक्षित श्रेणीत समाविष्ट असलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांचे संरक्षण आणि संवर्धन निसर्गप्रेमी व वन विभागाच्या माध्यमातून हरिहरेश्वर, दिवेआगर, तसेच श्रीवर्धन समुद्रकिनार्यावर होत आहे. काही वर्षांपूर्वी ऑलिव्ह रिडले जातीचे कासव मोठ्या संख्येने श्रीवर्धनमध्ये वाळूत अंडी घालायचे, मात्र गेल्या दीड-दोन वर्षांत वर्दळ वाढल्याने कासवांनी श्रीवर्धन समुद्रकिनार्याकडे पाठ फिरवली आहे.
ऑलिव्ह रिडले कासव श्रीवर्धन, दांडासह हरिहरेश्वर व दिवेआगर येथील समुद्रकिनार्यावरील वाळूत अंडी घालतात, एका कासवाकडून एकाच वेळी शंभर ते दीडशे अंडी घातली जायची. काही दिवसांतच ही अंडी नैसर्गिकरीत्या उबवली जायची, परंतु काही वर्षांपासून श्रीवर्धन समुद्रकिनारी पर्यटकांची वर्दळ वाढल्याने अंडी घालण्यासाठी येणार्या कासवांचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. कासव प्रजननाच्या काळात पाण्यापासून अंदाजे 70 ते 80 मीटर अंतरावर ओल्या वाळूत दीड ते अडीच फुटांचा खोल खड्डा खणून अंडी घालतात आणि पुन्हा खड्डा बुजवून पाण्यात परततात. श्रीवर्धन समुद्रकिनारी सुशोभीकरण करण्यात येत असून पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे दोन-तीन वर्षांत या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढली आहे.
तीन किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनार्यावरील ओल्या वाळूत होत असलेली मानवी वर्दळ, पर्यटकांच्या गाड्यांमुळे ओली वाळू पूर्णपणे दबली गेल्याने टणक झाली आहे. या वाळूत बिळ करणे कासवांसाठी जिकिरीचे होत असल्याने, तसेच अंडी घालण्यासाठी निवांत, सुरक्षित जागा मिळत नसल्याने ऑलिव्ह रिडले कासवांनी श्रीवर्धन समुद्रकिनार्याकडे पाठ फिरवल्याचे प्राणिमित्रांकडून सांगण्यात येत आहे.
श्रीवर्धन येथील दांडा समुद्रकिनार्यावर वाळूत अनेक वर्षे कासव अंडी घालण्यासाठी यायचे. रायडिंग वाहने व पर्यटकांची वर्दळ यामुळे संवेदनशील कासव या समुद्रकिनार्यावर फिरकेनासे झाले आहेत. ज्या परिसरात कासव अंडी घालतात, तो परिसर नोव्हेंबर ते मार्चदरम्यान विणीच्या हंगामात रहदारीसाठी पूर्ण बंद ठेवल्यास अथवा सेफ्टी झोन घोषित केल्यास ऑलिव्ह रिडले जातीचे कासव मोठ्या संख्येने पुन्हा श्रीवर्धन समुद्रकिनार्यावर येण्याची शक्यता आहे. वन विभाग व प्राणिमित्रांनी पुढाकार घेतल्यास श्रीवर्धन समुद्रकिनार्यावर पुन्हा ऑलिव्ह रिडले कासवांचे संवर्धन होऊ शकेल.
वर्षभरात कासवांचा विणीचा हंगाम साधारण दोनदा असतो. डिसेंबरमध्ये कासवांनी बिळ करून अंडी घातल्यास साधारणतः फेब्रुवारी-मार्चमध्ये अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. हा कालावधी कासवांच्या प्रजननासाठी अनुकूल असतो. या कालावधीमध्ये अंड्यातून बाहेर पडणारी पिल्ले सक्षम असतात. मात्र, फेब्रुवारीमध्ये कासवांनी अंडी घातल्यास एप्रिल-मेमध्ये पिल्ले बाहेर येतात. मात्र, ही पिल्ले काहीशी असक्षम होऊ शकतात. पिल्ल्यांच्या चालण्याच्या गतीवरून त्यांची शारीरिक क्षमता लक्षात येते.
– बाळू दिगंबर जगदाळे, कांदळवन वनरक्षक, श्रीवर्धन
दांडा परिसरात ऑलिव्ह रिडले जातीचे कासव अंडी घालत असल्याने ती जागा सुरक्षित असणे गरजेचे आहे. तिथली वाळू वारंवार दबली गेल्याने टणक झाली आहे. मादीला खड्डा खोदता येत नाही. पर्यटक व त्यांच्या गाड्या किनार्यावर आणत असल्याने कासव संवर्धनात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे दांडा परिसर सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.
– शैलेंद्र ठाकूर, प्राणीमित्र, श्रीवर्धन