जिल्ह्यात रुग्णवाढीत घट; सर्व दुकाने होणार सुरु

जिल्हाधिकारी यांचे आदेश लागू
अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पॉझेटिव्हीटी रेटनुसार निर्बंध लागू करण्यात आले होते. यात रायगड जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता जिल्ह्याचा समावेश चौथ्या स्तरात करण्यात आला होता. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता कडक निर्बंध असल्याने सर्वच दुकाने बंद होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या स्थितीवर जिल्हा प्रशासनाने नियंत्रण मिळवल्याने जिल्ह्याचा पॉझेटिव्हीटी रेट कमी झाला आहे. त्यानुसार आता रायगड जिल्हाचा समावेश चौथ्या स्तरातून तिसर्‍या स्तरात करण्यात आला आहे. यामुळे बहुतेक दुकाने, आस्थापना लागू करण्यात आलेल्या नियमांनुसार सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले  आहेत.

शुक्रवारी दि. 2 जुलैपासून जारी करण्यात आलेल्या या आदेशानुसार शनिवार दि. 3 जुलैपासून हे नियम लागू होतील. कोरोनाला आळा घालण्यासाठी शासन सर्व स्तरातून प्रयत्न करीत आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे लक्षात येताच राज्य सरकारने अनलॉक करण्यास सुरुवात केली. यासाठी जिल्हानिहाय परिस्थिती पाहता टप्प्यांत अनलॉक करण्याचा निर्णय घेतला. रायगड जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्ह्याचा पाचव्या टप्प्यात समावेश करण्यात आला होता. मात्र काही दिवसांपासून रायगड जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर खाली येत असल्याने जिल्ह्याचा तिसर्या स्तरात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून सर्व दुकाने सुरु करण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत. तसेच अत्यावश्यक वस्तू व सेवा वगळता इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 परंत सुरु राहतील पण शनिवार आणि

रविवार ही दुकाने पूर्णतः बंद राहतील.
सर्व अत्यावश्यक वस्तूंची व सेवांची दुकाने / आस्थापना या संपूर्ण आठवडाभर दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.नव्या आदेशानुसार अत्यावश्यक बाबींशी निगडीत नसलेली दुकाने / आस्थापना या सोमवार ते शुक्रवार या दरम्यान दुपारी
4.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. तथापि शनिवार व रविवार सदर दुकाने/आस्थापना पूर्णतः बंद राहतील. मॉल्स / चित्रपटगृहे (मल्टीप्लेक्स किंवा सिंगल स्क्रीन), नाट्यगृहे पूर्णतः बंद रहातील. उपहारगृह एकूण क्षमतेच्या 50 % मर्यादेत सोमवार ते शुक्रवार या दरम्यान दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.

सोमवार ते शुक्रवार दुपारी 4.00 नंतर तसेच शनिवार व रविवारी ऑर्डरप्रमाणे पदार्थ घेऊन जाणे, पार्सल देणे, घरपोच सेवा देणे इ. परवानगी असेल. सार्वजनिक ठिकाणे/मोकळ्या जागेत संपूर्ण आठवडाभर सकाळी 5.00 वाजलेपासून ते सकाळी 9.00 वाजेपर्यंत चालणे, सायकलिंग करणे यास मान्यता राहील. केवळ मान्यता प्राप्त / सूट देण्यात आलेली कार्यालये पूर्ण वेळ सुरु राहतील व इतर सर्व खाजगी कार्यालये दुपारी 4.00 वाजेपर्यंत विहित क्षमतेच्या 50 % मर्यादेत उपस्थितीच्या अधिन राहून कामकाजाच्या दिवशी सुरु राहतील. कोव्हिड-19 व्यवस्थापना संबंधीत कामकाज पाहणार्‍या व अत्यावश्यक सेवेशी निगडीत कार्यालयांमध्ये 100 % उपस्थिती अनुज्ञेय राहील. इतर सर्व शासकीय कार्यालये (खाजगी कार्यालयांना परवानगी दिली असल्यास तीसुध्दा) ही केवळ 50 % कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत सुरु राहतील. अधिकच्या उपस्थितीची आवश्यकता असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे परवानगी घेणे आवश्यक राहील. बाह्य मैदानी खेळास सकाळी 5.00 वाजलेपासून ते सकाळी 9.00 वाजेपर्यंत व सायंकाळी 6.00 वाजलेपासून ते रात्री 9.00 वाजेपर्यंतच्या कालावधीत संपूर्ण आठवडाभर मान्यता राहील. चित्रिकरण करताना अलगिकरण कक्ष म्हणजेच चित्रीकरणाच्या ठिकाणी अथवा त्याच्या जवळपास जेथून सार्वजनिक परिवहन सेवेचा वापर न करता समर्पित परिवहन सेवेच्या माध्यमातून संबधित व्यक्ती, कलाकार तसेच कर्मचारी यांची वाहतूक करता येईल अशा ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करणे बंधनकारक राहील. तथापि चित्रीकरण ठिकाणावरुन सायंकाळी 5.00 नंतर कोणतेही प्रकारच्या वाहतूकीस मान्यता राहणार नाही. सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजनाचे कार्यक्रम हे सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दुपारी 4.00 वाजेपर्यंत सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या 50 % मर्यादेच्या उपस्थितीत आयोजित करता येतील. तसेच शनिवारी व रविवारी सदर कार्यक्रमाचे आयोजनास बंदी राहील. लग्न समारंभासाठी 50 पेक्षा जास्त व्यक्तींची उपस्थिती अनुज्ञेय राहणार नाही. अनावश्यक गर्दी न होऊ देता, आवश्यक शारिरीक अंतर ठेवून कमाल 20 व्यक्तींच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पाडता येतील.

सदर बाबीची अंमलबजावणी करण्याची जाबाबदारी स्थानिक प्राधिकरण / प्रशासन यांची राहील. स्थानिक स्वराज्य संस्था / सहकारी संस्था यांच्या बैठका / निवडणूका या एकूण क्षमतेच्या 50 % मर्यादेत पार पाडता येतील. ज्या ठिकाणी बांधकाम मजूर प्रत्यक्ष बांधकाम ठिकाणी वास्तव्यास आहेत अशा ठिकाणी अथवा जेथे मजूर 4.00 वाजेपर्यंत कामावरुन निघतील केवळ अशा ठिकाणीच बांधकाम चालू ठेवण्यास परवानगी राहील. बांधकाम साईटवर बांधकाम साहित्यासाठी होणार्‍या वाहतुकी व्यतिरिक्त अन्य प्रकारची वाहतूक टाळण्यात यावी. कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व दुकाने / आस्थापना संपूर्ण आठवडाभर दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.  ई-कॉमर्स सेवेद्वारे सर्व प्रकारच्या वस्तू व सेवांच्या पुरवठ्यास परवानगी राहील.  सार्वजनिक ठिकाणी 5 किंवा 5 पेक्षा अधिक व्यक्तींना सकाळी 7.00 वाजलेपासून ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत एकत्र येण्यास मनाई राहील. तसेच सायंकाळी 5.00 वाजलेनंतर कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी पर्याप्त कारणाशिवाय किंवा मान्यता प्राप्त बाबींशिवाय जाता येणार नाही. व्यायमशाळा, सलून, ब्युटी पार्लर / सेंटरर्स, स्पा, वेलनेस सेंटरर्स हे दुपारी 4.00 वाजेपर्यंत 50 % क्षमतेच्या मर्यादेत सुरु राहतील. तथापि, पुर्वीनियोजीत भेटी ठरवून ग्राहकांना प्रवेश अनुज्ञेय असेल. तसेच सदर आस्थापनांमध्ये वातानुकूलन  यंत्रणा सुरु ठेवता येणार नाही. सार्वजनिक बस वाहतूक एकूण क्षमतेच्या 100 % प्रवाशांच्या मर्यादेत सुरु राहील. तथापि प्रवाशांना उभे राहून प्रवास करणे अनुज्ञेय नसेल. माल वाहतूक नियमितपणे सुरु राहील. सदर वाहनामध्ये जास्तीत जास्त 3 व्यक्तींना प्रवास अनुज्ञेय असेल. खाजगी कार/टॅक्सी/बसेस/लांब पल्याच्या रेल्वे गाड्या यांच्या माध्यमातून आंतरजिल्हा प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या बाबतीत, जर असे प्रवासी पाचव्या स्तरात  अंतर्भूत असलेल्या जिल्ह्यातून अथवा तेथे थांबून पुढे प्रवास करीत असतील तर अशा प्रवाश्यांकडे ई-पास असणे आवश्यक आहे. अशाप्रकारे ज्या प्रवाश्यांकडे ई-पासची असणे आवश्यक आहे, त्याबाबतीत वाहनातील सर्व प्रवाश्यांकडे वैयक्तीक ई-पास असणे आवश्यक असून, प्रवासी वाहनास स्वतंत्र ई-पासची आवश्यकता असणार नाही. आदी नियमांचा उल्लेख करण्यात आला आहे.

Exit mobile version