मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर अपघातांत घट

नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवर कारवाई

| पनवेल । वार्ताहर ।

महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे यांचे वतीने मुंबई पुणे द्रुतगतीमार्गावर मागील तीन महिन्यात अपघातांमध्ये लाक्षणिक घट तर वाहतुक नियमांचे उल्लंघन करणार्‍या एकूण 34,972 कसुरदार वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये धडक कारवाई करण्यात आली आहे.

राज्यातील महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याकरीता संजय कुमार वर्मा अपर पोलीस महासंचालक वाहतुक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे तानाजी चिखले, संदीप भागडीकर, गौरी मोरे, गणेश बुरकुल, प्रभारी अधिकारी महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे यांचे वतीने मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघातांचे मुख्य कारण हे वेग मर्यादेचे उल्लंघन, धोकादायक ओव्हरटेक, लेनची शिस्त न पाळल्यामुळे झाले असल्याचे निष्पन्न झाले आहे. महामार्गावरील अपघातांच्या प्रमाणामध्ये घट होण्याकरीता महामार्गावरील नेमुन दिलेल्या विहीत मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणार्‍या बेशिस्त वाहनचालकांवर व शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यार्‍या चालकांवर योग्य ती कार्यवाही करुन सदर चालकांचे प्रबोधन करून यापुढे त्यांचेकडुन अशा चुका भविष्यात होणार नाहीत, त्यांचेकडुन यापुढे नियमांचे पालन होईल, अपघात कमी होण्यास मदत होईल याबाबतची विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.

जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे हद्दीतील मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर लावण्यात आलेल्या स्पीड कॅमरा तसेच इंटरसेप्टर वाहनातील स्पीडगनद्वारे वेग मर्यादेचे उल्लंघन करणार्‍या एकुण 27,070 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे येथे नेमणुकीतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकरवी विना हेल्मेट 352, विना सिटबेल्ट 303, वाहन चालवितांना मोबाईलचा वापर करणे 355, विना परवाना वाहन चालविणे 48, चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणे 589, नो इन्ट्री व सुचना फलकांचे पालन न करणे 5058, नंबर प्लेट 120 व इतर उल्लंघन 1077 याप्रमाणे वाहतुक नियमांचे उल्लंघन करणार्‍या एकुण 34972 कसुरदार वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे अधिकारी व अंमलदार यांचेकडुन वेळोवेळी वाहतुक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहणांवर दंडात्मक कारवाई तसेच वाहन चालकांचे करण्यात आलेले प्रबोधन यामुळे महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे हददीत अपघातामध्ये जानेवारी ते मार्च मध्ये 2022 च्या तुलनेत 75 टक्के अपघात कमी झालेले दिसून येत आहेत, असे महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे प्रभारी अधिकारी पोउपनि गणेश बुरकुल यांनी सांगितले आहे.

Exit mobile version