एकात्मिक बालविकास विभागाचे नियोजन
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील कुपोषणाचा आलेख कमी येऊ लागला आहे. सध्या तालुक्यात अतितीव्र कुपोषित गटात केवळ 19 बालके आहेत. एकात्मिक बालविकास विभाग नियोजनपूर्वक काम करीत असल्याने तालुक्यातील कुपोषणाचे प्रमाण खाली आले असल्याचे स्पष्ट होत आहे.
तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतमधील डामसेवाडी या आदिवासी वाडीमधील चार वर्षीय बालक दुर्धर आजाराने त्रस्त आहे. या बालकाची आई मागील महिन्यात त्यांच्या आजारपणामुळे मृत झाली असल्याने त्या बालकाला आईचे दूध वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्या दुर्धर आजाराने कुपोषित बनलेल्या बालकाला कर्जत उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते बालक शरीराची वाढ झाली नसल्याने दूर्धर आजारी बनले असून आता त्या बालकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभाग आणि एकात्मिक बालविकास विभाग यांनी केला आहे.
सध्या ते बाल आरोग्य केंद्रात उपचार घेत असल्याने त्याची प्रकृती स्थिर आहे. जगदीश आवाटे यांच्या पत्नीचे दुसरे बालक जन्मल्यानंतर त्या बालकाची आई सरिता यांचे तीन महिन्यांनी निधन झाले. त्याआधी संबंधित बालकाची आई ही टीबीने आजारी होती. त्यामुळे सप्टेंबर 2022 मध्ये जन्मलेल्या त्या बाळाला स्वतःच्या अंगावरील दूध पाजू शकली नाही. परिणामी, त्या बालकाची शारीरिक वाढ वेळेवर होऊ शकली नाही. त्याचवेळी त्या बालकाचे वजन वयानुसार वाढायला हवे होते ते देखील वाढले नाही.
कर्जत तालुक्यात कुपोषित बालकांसाठी कार्य करणार्या एकात्मिक बालविकास प्रकल्प आणि युनायटेड वे या संस्थेने आईचे छत्र हरवलेल्या चार महिन्याचे बालकाला तालुक्यातील अन्य बालकांप्रमाणे पोषण आहार देण्यास सुरुवात केली होती. मात्र आईच्या मृत्यूनंतर त्या चार महिन्यांच्या बालकाला आधार उरला नव्हता. बाळाच्या आजीने त्या बाळाला कशेळे जवळील कवठे वाडी येथे पालन पोषण करण्यासाठी नेले होते.
गरोदर माता आणि नंतर जन्मलेले बालक यांची वजने तसेच लसीकरण हे एकात्मिक बालविकास यांच्याकडून वेळोवेळी केले जाते. त्यामुळे वजन कमी असल्याने एकात्मिक बालविकास पथकाने डामसेवाडी येथे ते बालक आढळून आले नाही आणि त्यामुळे प्रकल्प अधिकारी पालकर आणि पर्यवेक्षिका शरयू तांबे यांनी त्या बालकांचे मामाचे गाव असलेले कवठेवाडी येथे जाऊन बाळाची चौकशी केली. त्यावेळी बालकांचे वजन कमी असल्याचे पाहून खबरदारी म्हणून त्या बालकाला रुग्णालयात दाखल करायला हवे हे बालकाच्या नातेवाईकांना पटवून देण्यात आले.शेवटी नातेवाईक मंडळी तयार झाल्याने एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्याकडून त्या बालकाला कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात खास कुपोषित बालकांसाठी राबविल्या जाणार्या बाल उपचार केंद्रात दाखल केले.
कवठेवाडी येथून आणलेल्या त्या बालकाच्या शरीराची वाढ न झालेली असल्यानं त्या बालकाची रुग्णालयाचे अधीक्षक आणि बालरोग तज्ञ डॉ.मनोज बनसोडे यांनी तपासणी केली आणि त्या बालकाला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथील बाल उपचार केंद्रात या बालकाला दाखल केले. त्यावेळी बालकाचे वजन हे फक्त एक किलो आठशे ग्रॅम एवढे होते. सध्या कर्जत उपजिल्हा रुग्णालयात त्या बालकावर उपचार सुरू असून त्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.
आईचे दूधच पोषक
कर्जत तालुक्यातील कुपोषणाचा विषय पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यात एकात्मिक बालविकास हे प्रकल्प सहा महिने ते सहा वर्षे या कालावधीत पोषण आहार देत असते. बाळ जन्मल्यानंतर सहा महिने आईच्या अंगावरील दूध हेच त्या बालकांचे अन्न असते आणि त्यामुळे त्या बालकाला शासनाच्या कोणत्याही योजनेतून पोषण आहार देण्यात येत नव्हता. कायद्याने ते बालक कुपोषित नसल्याने त्याची जबाबदारी सहा महिन्यापर्यंत आई वडिलांची असते.
सामाजिक संस्थांचा पुढाकार
कर्जत तालुक्यात अशा बालकांना युनायटेड वे ही संस्था गेली 15 वर्षे कुपोषण निर्मूलन कामासाठी एकात्मिक बालविकास विभागाला मदत करीत आहे. या संस्थेकडून मोठ्या प्रमाणात कुपोषित बालकांना पोषण आहार दिला जातो. अनेक सामाजिक संस्था आणि एकात्मिक बालविकास विभाग यांनी नियोजनपूर्वक काम केले आणि त्यामुळे कर्जत तालुक्यातील कुपोषण खाली आले आहे. तालुक्यात एकात्मिक बालविकास विभाग यांच्या 340 अंगणवाड्या आणि 60 मिनी अंगणवाडी आहेत. मात्र तरी देखील तालुक्यातील कुपोषणाचे प्रमाण अल्प आहे. सध्या अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या 19 इतकी असून तीव्र कुपोषित बालके ही दोन्ही 134 इतकी आहे.