। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
पावसाने उघडीप दिल्यानंतर मागील आठवडाभरापासून कमाल-किमान तापमानात घसरण होत आहे. 23 डिसेंबरपर्यंत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. यानुसार जिल्ह्याच्या तापमानात 12.7 अंश सेल्सिअस एवढी यंदाची नीचांकी नोंद झाली. जिल्ह्यात सगळीकडेच थंडी जाणवत असून ग्रामीण भाग धुक्याने व्यापलेला पाहायला मिळत आहे.
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली असून हे थंड वारे महाराष्ट्राकडे येऊ लागले आहेत. गेले तीन दिवस जिल्ह्यातही हलके वारे वाहू लागले आहे. या वार्यांबरोबरच थंडीनेही प्रवेश केला असून त्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. बहुतांशी भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत 2 ते 3 अंशांनी घट झाली.
रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी किमान तापमान 15 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. कमाल तापमान 30 अंशापर्यंत होते. शुक्रवारपासून तापमानात घसरण सुरू झाली.
संगमेश्वर, लांजा, गुहागरसह अन्य तालुक्यांच्या ग्रामीण भाग धुक्यातच होते. दिवसभर हलके गार वारे वाहत असल्यामुळे वातावरण थंडच होते. रविवार असल्यामुळे अनेकांनी घरीच थांबणे पसंत केले. सायंकाळी मांडवी, भाट्ये, आरे-वारे, गावखडी, मालगुंडसारख्या किनारी फिरण्याचा आनंद घेतला. रात्री आणि सकाळी गावागावांत शेकोट्या पेटू लागल्या आहेत. थंडीचा कडाका पुढे वाढतच राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे.
दरम्यान, थंडीचा वाढता कडाका आंबा बागायतदारांसाठी दिलासादायक ठरत आहे. अवकाळीमुळे आंबा उत्पादनाच्या स्थितीवर साशंकता व्यक्त करणारा बागायतदाराला आशादायी चित्र दिसू लागले आहे. तिसर्या टप्प्यातील मोहोर व्यवस्थित आला तर त्यामधून एप्रिलच्या अखेरीस तरी उत्पादन चांगले येऊ शकते असा अंदाज बागायतदारांकडून व्यक्त होत आहे.