पंतप्रधान मोदींच्या हस्ते पिकांचे 35 वाण समर्पित

सोयाबीन, बाजरी, गहूसह मक्याच्या जातींचा समावेश
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
हवामान बदलाचा फटका कायम देशातील शेतीला बसत आहे. त्यामुळे बदलत्या हवामानात तग धरु शकतील अशा नव्या 35 पिकांचे वाण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाला समर्पित करण्यात आले. भारतीय कृषी संशोधन परिषदेने (खउअठ) ही विशेष गुण असलेले वाण विकसित केले आहेत.

हवामान बदल आणि कुपोषणाच्या दुहेरी आव्हानांना तोंड देण्यासाठी हे वाण निश्‍चितच लाभदायक ठरणार आहेत. आयसीएआर संस्था, राज्य आणि केंद्रीय कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्र येथे मंगळवारी आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नवीन पीक वाण देशाला समर्पित करण्यात आले. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये हवामानातील लवचिकता आणि उच्च पोषक घटकांसारखे विशेष गुण असलेल्या या नवीन 35 पीक जाती विकसित केल्या गेल्या आहेत.

यावेळी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, पीएम-किसान आणि किसान रेल्वेच्या माध्यमातून वाहतूक सुविधा देणार्‍या अनेक योजना सुरू केल्या आहेत. बियाणापासून ते बाजारापर्यंत, त्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी आणि शेती क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी योगदान देण्यासाठी सुविधा पुरवल्या जात आहेत, असेही तोमर म्हणाले.

या वाणांचा सहभाग
दुष्काळ सहन करू शकणारे चणे, तूर, लवकर पिकणारे सोयाबीनचे वाण, तांदळाचे रोग प्रतिरोधक वाण, गहू, मोती बाजरी, मका आणि चणे, क्विनोआ, बकव्हीट, विंगड बीन आणि फॅबा बीन यांचा समावेश आहे. या विशेष गुणांच्या पिकांच्या जातींमध्ये काही पिकांमध्ये आढळणार्‍या पोषणविरोधी घटकांचाही समावेश आहे, जे मानवी आणि प्राण्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम करतात.

देशातील 86 टक्के शेतकरी हे छोटे शेतकरी आहेत आणि पंतप्रधानांचे लक्ष या शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवणे हे आहे. पंतप्रधानांचा असा विश्‍वास आहे की शेतकर्‍यांनी इतरांच्या दयेवर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर हिमतीने उभे राहावे.

नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय कृषीमंत्री
Exit mobile version