विजयाची खुर्ची जनतेला अर्पण: नगराध्यक्षा भावना घाणेकर

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरणच्या नागरिकांनी महाविकास आघाडीला भरभरून यश दिले आहे. मला ही नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून भरभरून यश दिले. त्यामुळे आज या खुर्चीवर विराजमान होताना नक्कीच उरणकरांच्या कामाचे दडपण आले आहे. मात्र, नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीचा मान ठेवून, मी सगळ्यांच्या भावनांचा आदर कायम राखत, जनतेची कामे करत राहीन. कारण, ज्या खुर्चीसाठी माझा विजय झाला. ती ही खुर्ची त्या विजयाच्या दिवसापासून मी जनतेला अर्पण केली आहे. ही खुर्ची म्हणजे तुमचे सर्वांचे ऋण आणि जबाबदारीची खुर्ची आहे. त्यामुळे उरणच्या विकासकामात कोणी अडथळा आणला, तर त्याला आडवा केल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी व्यक्त केले.

प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पदाच्या खुर्चीवर शुक्रवारी (दि.26) नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर या विराजमान होऊन, त्यांनी पदभार स्वीकारला. त्यावेळी त्या आपल्या भावना व्यक्त करताना बोलत होत्या. यापुढे भावनाताई घाणेकर यांनी गर्व आणि अहंकार कोणाचा टिकला का? असा सवालही केला. जेव्हा जनता जनार्दनाच्या मनात येते, तेव्हा ही जनता कोणाला वरती आणि कोणाला खाली बसवायचे, हे सर्व काही जनताच ठरवते. आपण अनेक रथी महारथींच्या बोटी बुडविल्याचे पाहिले आहे. त्यामुळे अहंकार माझ्या मनामध्ये कधीच येणार नाही. आणि आलाच तर मला माझी तुम्ही जागा दाखवून द्या. या खुर्चीचा मान ठेवून मी जनतेची कामे करीत राहीन, माझा संपूर्ण वेळ मी जनतेसाठी देईन. मी तुमची, या उरणची लेक म्हणून मी चुकले, तर तुम्ही माझे हक्काने कान पकडा. तुम्हाला तो अधिकार आहे. बायपास रस्ता, उरणच्या पाण्याचा प्रश्न, वाहतूक कोंडीचा प्रश्न रस्त्यांची दुरवस्था, असे अनेक समस्यांचे प्रश्न आहेत. त्याच्यावर भर दिला जाईल. बोरी गावातील ज्या काही समस्या आहेत, त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल. निवडणुकीच्या काळात इथल्या सत्ताधाऱ्यांनी नेत्यांवर आरोप केले, त्यांना मी सोडणार नाही. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाई झाली, मात्र जनतेने चांगला कौल दिला. आणि महत्त्वाचे नगराध्यक्षपद आपल्याकडे आले. त्यामुळे महाविकास आघाडीने आपल्या पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून आपण लोकसेवक म्हणून लोकांची सेवा करण्याला प्राधान्य देण्याचे कबूल केले.

सत्ताधाऱ्यांनी मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केले. मात्र, या खुर्चीचा आदर राखत पंधरा दिवसांतून जनता दरबार भरविला जाईल, अशी ग्वाही दिली. हेल्पलाईन दिली जाईल. लोकांच्या मूलभूत गरजा सोडविण्यासाठी माझे दालन जनतेसाठी नेहमीच खुले राहील. ही खुर्ची जनतेला अर्पण केले आहे. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांसह आंतरराष्ट्रीय कामगार नेते तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, संतोष पवार, भूषण पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते तसेच उरणच्या नागरिकांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.

Exit mobile version