। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील मानिवली ग्रामपंचायत मधील मोहिली गावातील मंदिराचा सभामंडप तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य सीमा पेमारे यांच्या निधीमधून बांधण्यात आले आहे. मोहिली गावातील श्री राममंदिर समोर उभारलेल्या सभामंडपाचे लोकार्पण शेकाप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केले.
मोहिली गावातील श्रीराम मंदिराच्या समोर सभामंडप जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात यावा यासाठी तत्कालीन दिवंगत जिल्हा परिषद सदस्य सुदाम पेमारे आणि तत्कालीन दिवंगत सरपंच प्रवीण पाटील यांची इच्छा होती. त्यानुसार जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना सीमा पेमारे आणि उपसरपंच संकेत पाटील यांनी सभामंडपासाठी प्रयत्न केले होते. सीमा पेमारे यांचा सेस निधी वापरून मोहिली गावातील श्रीराम मंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर मोहिली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात करण्यात आले. त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती नारायण डामसे, शेकापचे तालुका प्रभारी चिटणीस श्रीराम राणे, जिल्हा परिषद सदस्या सीमा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गजानन पेमारे, कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती यशवंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
मनिवली ग्रामपंचायतचे उपसरपंच संकेत पाटील यांनी यावेळी प्रास्ताविक करताना सभामंडपाचे कामाची माहिती दिली.त्यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच तुषार गवळी, मानसी प्रवीण पाटील, शेकाप अल्पसंख्याक सेलचे जिल्हा अध्यक्ष बबन भालेराव, माजी सरपंच रवींद्र झांजे, माजी उपसरपंच रमेश गवळी, शेकापचे विभागीय चिटणिस पांडुरंग बडे, शेकाप युवा कार्यकर्ते महेश म्हसे यांची प्रमुख उपस्थिती होती.