खारीतील तलावाचे खोलीकरण

रवींद्र घरत यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ

| चौल | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील चौलमळा गावच्या खारीतील तलावाचे खोलीकरण आणि साफसफाईच्या कामाचा शुभारंभ रविवारी (दि. 19) गावचे प्रमुख रवींद्र घरत यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी उपप्रमुख जितेंद्र पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अलिबागपासून साधारण 12 किलोमीटर अंतरावर अलिबाग-रेवदंडा मुख्य रस्त्यालगत चौलमळा गाव आहे. गावातील कोणतेही काम हे ग्रामस्थांच्या एकीतूनच केले जाते. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आहे. दरवर्षी खारीतील तलावात गौरी-गणपतीचे विसर्जन केले जाते. परंतु, सभोवताली असणार्‍या खाडीतील पाण्याच्या प्रवाहामुळे हा तलाव माती व अन्य कचरा येऊन भरला होता. दरम्यान, आगामी गणेशोत्सव काळात ग्रामस्थांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी रवींद्र घरत यांच्या अध्यक्षतेखातील तलावाचे खोलीकरण आणि साफसफाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रविवारी पोकलेनच्या सहाय्याने तलाव खोलीकरण करण्याचे काम हातात घेण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी तलाव परिसरातील वाढलेली झाडीझुडपे व अन्य कचरा साफ करुन त्याची योग्य विल्हेवाट लावली. सकाळी आठ वाजल्यापासून ग्रामस्थांनी स्वच्छता मोहीम हाती घेत अवघ्या काही तासातच हा तलाव परिसर चकाचक केला. ‘गाव करील ते राव काय करील’ याचा प्रत्यय ग्रामस्थांच्या कृतीतून सार्थ ठरला. या कामासाठी गावप्रमुख रवींद्र घरत आणि उपप्रमुख जितेंद्र पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी गावचे खजिनदार अल्पेश घरत, रवींद्र नाईक, प्रशांत आमरे, सचिन गोंधळी, महेश पाटील, प्रितेश म्हात्रे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version