। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहरातील कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी दीपोत्सव साजरा केला. शाळेचे संस्थापक दादासाहेब लिमये यांच्या जयंतीनिमित्त शाळेच्या परिसरात दिव्यांची रांगोळी साकारून त्यावर मातीचे दिवे ठेवत तब्बल 41 हजारांहून अधिक दिव्यांच्या रोषणाईमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि पालकांसमवेत हा दीपोत्सव साजरा केला.
गतवर्षी 11 हजार दिव्यांच्या रोषणाइमध्ये हा दीपोत्सव पार पडला होता. यावर्षी देखील अशाच पद्धतीने दीपोत्सव साजरा करण्याची संकल्पना मांडण्यात आल्यानंतर शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी प्रत्येक मुलांना केवळ 5 मातीच्या पणत्यांच्या दिव्यांचे योगदान देण्याचे आवाहन केले होते. आणि मुलांनी या दीपोत्सवासाठी उत्साह दाखवीत तब्बल 41 हजार दिवे शाळेत जमा केले. यामध्ये संस्थेच्यावतीने 500 लिटर तेल दीपोत्सवासाठी उपलब्ध करून देत एक आगळा वेगळा असा दीपोत्सव साजरा केला. यावेळी सुरेश शिंदे, पूनम कांबळे, अनिता पाटील, बाबुराव शिंदे, धर्मेंद्र दीक्षित, पाटील, संजय पाटील, अण्णासाहेब झिटे, बिना कडू, प्रसाद सहस्त्रबुद्धे, अजय सूर्यवंशी, कुलकर्णी, मोकल आदींसह शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.