| रसायनी | प्रतिनिधी |
जगातील एकमेव संजीवन समाधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधीला यंदा 729 वर्षे पूर्ण झाली. या पवित्र दिनाचे औचित्य साधत पंडित कल्याण गायकवाड संगीत प्रतिष्ठानच्यावतीने भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आध्यात्म, भक्ति आणि परंपरेचा संगम घडवणाऱ्या या उपक्रमाला यावर्षी 14 वर्षे पूर्ण झाली आहेत.
संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीच्या तेजस्वी स्मृती चेतवणारा हा दीपोत्सव भाविकांसाठी भक्तिसंवेदना, आध्यात्मिक ऊर्जा आणि सामूहिक साधनेचा एक अविरत सोहळा ठरला. या कार्यक्रमाचे उद्घाटन गायिका कार्तिकी गायकवाड आणि गायक कौस्तुभ गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात स्वरभूषण पूनमताई नळकांडे यांच्या सुमधुर अभंगवाणीने झाली. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, टाळी वाजवावी, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, कोणे गावी आहे हा सांगावा असे एकापेक्षा एक अभंग त्यांनी सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच, या दीपोत्सवात रांगोळीकार राजश्री भागवत यांनी डोळ्यांची पारण फेडणारी रांगोळी साकारून उपस्थितांना विलक्षण कलानुभूती दिली.
या सोहळ्यात संदीप राक्षे लिखित ‘निमित्तमात्र’ या कथासंग्रहाचा लोकार्पण सोहळाही संपन्न झाला. कार्यक्रमाचा शेवट कार्तिकी गायकवाड हिने ‘मोगरा फुलला’ हा अभंग गाऊन वातावरणात चैतन्य निर्माण केले व कौस्तुभ गायकवाड यांनी ‘देव निवृत्ती याने धरले दोन्ही कर’ हा समाधीचा अभंग गाऊन उपस्थित श्रोत्यांना भावनाविवश केले होते. या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप राक्षे, गणेश नळकांडे, राजेश टाकळकर, विजय मानकर, साहेबराव कवडेकर, पोपट कदम, राजेंद्र येवला, रामदास ठोंबरे, अमोल ठोंबरे, काव्या गायकवाड, गायिका श्रद्धा साळुंके, मनोज कदम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष साळुंके यांनी केले. या भव्य दीपोत्सवाचे सुयोग्य आयोजन संकेत संदीप राक्षे यांनी समर्थपणे पार पाडले.







