दीप्ती शर्मा, रिचा घोषची झुंज व्यर्थ?

भारताने एकदिवसीय मालिका गमावली

। मुंबई । वार्ताहर।

दीप्ती शर्माच्या पाच विकेट आणि त्यानंतर रिचा घोषची 96 धावांची जिगरबाज खेळी व्यर्थ ठरली. भारतीय महिलांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात चार धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. यात सोडलेल्या झेलांचाही फटका बसला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रलियाने 8 बाद 258 धावा केल्या होत्या. उत्तरादाखल भारताने 4 बाद 218 धावांपर्यंत मजल मारली होती, परंतु 35 चेंडूत 39 धावांची गरज असताना रिचा घोष 96 धावांवर बाद झाली आणि तेथूनच भारताची पकड ढिली झाली.

वजयाचे आव्हान अवाक्यातले असले तरी भारताची सुरुवात विचारपूर्वक होती. शेफाली वर्माऐवजी स्मृती मानधनाचे पुनरागमन झाले तिने यास्तिका भाटीयासह सहा धावांच्या सरासरीने 37 धावांची सलामी दिली. मात्र दोघींनाही मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही. 15 षटकांत 2 बाद 71 अशी सुरुवात केल्यानंतर रिचा घोष आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी संघाला दीडशेच्या पलिकडे मजल मारुन दिली. आज जेमिमा नशिबवान होती. तिचा झेल तर सुटलाच त्याचरोबर डीआरएसमध्ये निर्णय तिच्या बाजूने लागला. 44 धावां करुन ती बाद झाली, परंतु तोपर्यंत संघाला सुस्थितीत नेले होते. मात्र कर्णधार हरमनप्रित पुन्हा एकदा अपयशी ठरल्यामुळे ऑस्ट्रेलियाला डोके वर काढण्याची संधी मिळाली.

अमनज्योत कौरने पहिल्याच षटकांत लिचफिल्ड हिचा शुन्यावर झेल सोडला तेथूनच भारतीय खेळाडूंची जणू काही झेल सोडण्याची स्पर्धा सुरु झाली. 49 व्या षटकापर्यंत ही स्पर्धा सुरु होती. अलिसा हिली, इलिस पेरी, ताहिला मॅग्रा आणि अनाबेल सदरलँड यांचे झेल सोडण्यात आले, अनुभवी स्मृती मानधानाला तर दोन झेल पकडता आले नाहीत. यातच सुरुवातीला हिली हिच्याविरुद्ध डीआरएसचे अपिल करण्यात आले नाही. रिल्पेमध्ये ती पायचीत असल्याचे दिसून आले.

वस्त्रकारने हिलीला बाद केले त्यानंतर लिचफिल्ड आणि इलिस पेरी यांनी 77 धावांची भागीदारी केली तेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ मोठी धावसंख्या उभारणार असे चित्र होते. पण फिरकी गोलंदाज दिप्ती शर्मा गोलंदाजीस आली आणि चित्र बदलत गेले. लिचफिल्ड आणि पेरी यांनी अर्धशतके केली मात्र इतरांना मोठ्या धावा भारतीय गोलंदाजांनी करु दिल्या नाहीत. ऑस्ट्रेलियाची आठवी फलंदाज बाद झाली तेव्हा त्यांच्या खात्यात 218 धावाच झाल्या होत्या. परंतु अ‍ॅल्ना किंग आणि किम ग्रेथ यांनी 39 धावांची भागीदारी केली. किंगने तर वस्त्रकार टाकत असलेल्या अखेरच्या षटकांत दोन षटकारांसह 19 धावा फटकावल्या.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया: 50 षटकांत 8 बाद 258 (फोबे लिचफिल्ड 63 - 98 चेंडू, 6 चौकार, इलिस पेरी 50 - 47 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार,    ताहिला मॅग्रा 24, अनाबेल सदरलँड 23, अ‍ॅल्ना किंग नाबाद 28 - 17 चेंडू, 3 षटकार, पूजा वस्त्रकार 10-0-59-1, श्रेयांका पाटील 10-0-43-1, दीप्ती शर्मा 10-0-38-5)
भारत: 50 षटकांत 8 बाद 255 (स्मती मानधना 34- 38 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, रिचा घोष 96 - 117 चेंडू, 13 चौकार, जेमिमा रॉड्रिग्ज 44, दीप्ती शर्मा 24, सदरलँड 9-0-47-3, वेअरहॅम 7-0-39-2)
रिचा घोषचे शतक हुकले
तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करणार्‍या रिचा घोषने एक बाजू सांभाळून चांगली फटकेबाजी केली. संधी मिळताच तिने 13 चौकारांची पेरणी केली. मात्र पहिल्यावहिल्या शतकापासून ती चार धावा दूर राहिली. ती बाद झाली तेव्हा भारताला विजयासाठी 35 चेंडूंत 39 धावांची गरज होती.
Exit mobile version